
शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपालपदावरून हटवा, अशी मागणी समाजातील सर्वच स्तरांतून होत आहे. त्यानंतरही राज्य व पेंद्रातील सत्ताधाऱ्यांकडून त्यांची पाठराखण सुरू आहे. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजणार नसतील तर उठाव होणारच, असा निर्वाणीचा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे. दरम्यान, संभाजीराजे यांच्या स्वराज्य संघटनेने आक्रमक भूमिका घेत राज्यपालांचे सर्व कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिला आहे.
शिवरायांचा अवमान करणाऱ्या कोश्यारी यांच्याविरोधात सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. राज्यपाल हटावची मागणी महाराष्ट्रभरातून होत आहे. भाजपचे राज्यसभा सदस्य खासदार उदयनराजे भोसले. संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना पत्र लिहून कोश्यारी यांना राज्यपालपदावरून हटवून महाराष्ट्राबाहेर काढा अशी मागणी केली आहे. मात्र, यासंदर्भात कोणतीच कारवाई होताना दिसत नसल्याने संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वातील स्वराज्य संघटनेने महाराष्ट्रात होणारे कोश्यारी यांचे कार्यक्रम उधळून लावणार असल्याची भूमिका जाहीर केली आहे. राज्यपालांविरोधात महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करून कोश्यारींना सळो की पळो करून सोडण्यात येईल, असा इशारा स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते डॉ. धनंजय जाधव यांनी दिला आहे.
राज्यपालांना कितीही राजशिष्टाचार असला, तसेच ते कितीही प्रथम नागरिक असले तरी, या महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांच्यापेक्षा त्या उपर कुणीही नाही, असे जाधव यांनी ठणकावले.
शिवसेनेच्या राज्यपालांविरोधातील आंदोलनाला भारतीय जय हिंद पार्टीचा पाठिंबा
महाराष्ट्रातील घटनाबाह्य शिंदे सरकारच्या काळात राज्यात हुकूमशाही सुरू आहे. भाजप आणि राज्यपालांकडून जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराज तसेच महापुरुषांचा अवमान केला जात आहे. छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या कोश्यारींना राज्यपाल पदावरून हटविण्यात यावे, अशी भारतीय जय हिंद पार्टीची मागणी आहे. राज्यपालांविरोधात शिवसेने घेतलेल्या भूमिकेला आणि पुकारण्यात येणाऱ्या आंदोलनाला भारतीय जय हिंद पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष देशगौरव भोसले यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.
‘कोश्यारी हटवा, दिल्लीला परत पाठवा’, असे सांगत राज्यभरातील पदाधिकारी कोश्यारी यांच्या विरोधात निदर्शने करून निवेदने देणार आहेत. तसेच राज्यपालांचे राज्यभरातील कार्यक्रम स्वराज्य संघटना उधळून लावेल, असा इशारा संघटनेचे प्रवक्ते धनंजय जाधव यांनी दिला आहे.
काय म्हणाले होते राज्यपाल?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी, छत्रपती शिवाजी महाराज जुनेपुराणे असून तरुणांनी आता नवीन आदर्श शोधले पाहिजेत, असे भयंकर विधान केले होते.
राज्यकर्ते राज्यपालांच्या विधानाशी सहमत आहेत का?
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर अजून कोणतीही कारवाई झालेली नाही. कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का? महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहीत धरू नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच!
राज्यपाल कोश्यारी यांच्या विधानावरून शिवप्रेमींचा उद्रेक झाला. राज्यात ठिकठिकाणी तीव्र निदर्शने करण्यात आली. धोतर जाळून, जोडे मारून निषेध नोंदविण्यात आला. मात्र मिंधे सरकारने राज्यपालांची पाठराखण करत सारवासारव केली. राज्यपालांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आला, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
उदयनराजे यांची भूमिका आज ठरणार
शिवरायांचा अवमान करणारी प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे, अशी आक्रमक भूमिका घेत भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राज्यपाल कोश्यारींना तत्काळ हटविण्याची मागणी केली आहे. शिवरायांच्या मुद्दय़ावर अजिबात माघार नाही, असे स्पष्ट करत उदयनराजे यांनी चार दिवसांचा अल्टिमेटम सरकारला दिला होता. ते त्यांची पुढील भूमिका उद्या सोमवारी 28 नोव्हेंबर रोजी जाहीर करणार आहेत.
































































