
16 सप्टेंबर रोजी शहरात मंत्रिमंडळ बैठक होत आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांसह, दोन उपमुख्यमंत्री आणि मंत्री उपस्थित राहणार आहे. मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती असली तरी पाहुण्यांचा पाहुणचार चांगला झाला पाहिजे, असे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत दिले.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे यंदा पंचाहत्तरावे वर्ष आहे, या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त छत्रपती संभाजीनगरात होणार्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह मंत्री उपस्थित राहणार आहेत. 17 सप्टेंबर रोजी होणार्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री 16 सप्टेंबर रोजी शहरात दाखल होणार आहेत. त्यामुळे कामात काम म्हणून 16 सप्टेंबरला शहरात मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. आज शुक्रवारी दुष्काळी परिस्थितीसंदर्भात कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतली. बैठकीतील चर्चा संपल्यानंतर त्यांनी आपण अधिवेशनात मराठवाड्याच्या प्रश्नासंदर्भात छत्रपती संभाजीनगरला बैठक घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार 16 सप्टेंबरला शहरात मंंत्रिमंडळाची बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मराठवाड्यातील मंत्री शहरात येणार आहेत. दुष्काळी परिस्थिती असली तरी या पाहुण्यांच्या पाहुणचारात काही कमी पडू नये, याची काळजी घेण्याचे निर्देश उपस्थित जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह महसूल अधिकार्यांना दिले. त्यांनी दिलेल्या या निर्देशामुळे अधिकारी मात्र चक्रावून गेले.
पालकमंत्री, सहकारमंत्री अर्ध्या बैठकीतून उठून गेले…
मराठवाड्यात दुष्काळाची भयावह स्थिती आहे. खरीप हंगाम शेतकर्यांच्या हातून गेला. ऑगस्ट महिना संपत येत असतानाही अद्याप पावसाचा पत्ता नाही. 25 दिवसापासून पावसाचा एक थेंबही पडलेला नाही. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. या परिस्थितीचे मात्र मिंधे सरकारच्या मंत्र्यांना काहीच गांभीर्य नसल्याचा प्रकार समोर आला. मराठवाड्यातील भयावह दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी आज शुक्रवारी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी बैठक घेतली. या बैठकीला मराठवाड्यातील रोहयोमंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे आणि गृहनिर्माणमंत्री अतुल सावे या दोन मंत्र्यांचीच उपस्थिती होती. बैठकीत भयावह दुष्काळ परिस्थितीचा आढावा घेण्याचे काम सुरू होते. यातच पालकमंत्री संदिपान भुमरे आणि गृहनिर्माणमंत्री अतुल सावे अर्ध्या बैठकीतून उठून निघून गेले.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती भीषण आहे. कृषी मंत्रालयाकडून आणि महसूल विभागाकडून कुठल्या उपाययोजना केल्या जात आहेत, याची माहिती घेण्याचीही तसदी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी घेतली नाही. ते अर्ध्यावर बैठक सोडून निघून गेल्याने दुष्काळाबद्दल ते किती संवेदनशील आहेत, याची प्रचीती दिसून आली.
तानाजी सावंत ऑनलाईन भडकले!
दुष्काळी परिस्थितीत जनावरांना पाणी आणि चार्यांची कमतरता पडू नये, यासाठी काय नियोजन करता येईल, यावर आढावा बैठकीत चर्चा सुरू होती. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी खात्याच्या अधिकार्याला चार्याबाबत काय धोरण आहे याची माहिती सभागृहाला सांगण्याची सूचना केली. त्यानुसार त्या अधिकार्याने सरकारी परिपत्रकाचे वाचन करीत मोठ्या आणि लहान जनावरांसाठी किती चारा उपलब्ध करून द्यायचा याबाबत माहिती दिली. यावर बैठकीत ऑनलाईन उपस्थित असलेले आरोग्यमंत्री तानाजी सावंत ही माहिती ऐकून भडकले. एवढ्या कमी चार्यावर जनावरे जगतील का? असा सवाल त्यांनी त्यांच्याच सरकारमधील मंत्र्यांना केला. त्यावर कृषिमंत्र्यांनी हा विषय या बैठकीचा नाही, आपण मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय मांडू, अशी विनंती करीत त्यांना शांत केले.
रेनफॉल मॉनिटर मशीनमुळे सरकारला डोकेदुखी
राज्यातील प्रत्येक मंडळात किती पाऊस पडला, याची ऑनलाईन माहिती घेण्यासाठी रेनफॉल मॉनिटर मशीन बसविण्यात आल्या आहेत. या मशीन मंडळातील कुठल्याही भागात किरकोळ पाऊस पडला तरी पूर्ण मंडळात पाऊस पडल्याचे नोंद करतात. यामुळे विमा कंपन्या नुकसान भरपाई देताना पाऊस पडला नसल्याचे ग्राह्य धरीत नाहीत. यामुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनीही या रेनफॉल मशीनमुळे पीक विमा कंपन्याकडून शेतकर्यांना मिळणार्या भरपाईत कसा तोटा होतो, याची माहिती माध्यमांसमोर ठेवली. शेतकर्यांचे नुकसान टाळण्यासाठी रेनफॉल मॉनिटर मशीनचा आपण मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय मांडणार आहोत. सरकारने हा विषय केंद्रीय कृषिमंत्र्यांशी चर्चा करून सोडवावा असा आग्रह आपण धरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
































































