
बापू सुळे
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांकडून सर्वच गर्दीच्या ठिकाणी कडेकोट सुरक्षा लावली जात असतानाच दररोज लाखो प्रवाशांची वर्दळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकातील सुरक्षा वाऱयावर असल्याचे समोर आले आहे. स्थानकात येणाऱया प्रवाशांबरोबरच त्यांच्या सामानाची तपासणी करण्यासाठी असलेल्या बॅग स्कॅनर मशीन धूळ खात पडल्या आहेत. अनेक ठिकाणच्या मेटल डिटेक्टर फ्रेम बंद असून काही ठिकाणी सायडिंगला टाकल्या आहेत. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मुंबईवरील ‘26/11’च्या दहशतवादी हल्ल्यानंतर रेल्वेने सीएसएमटीसह सर्वच स्थानकांत येणाऱया प्रवाशांबरोबरच त्यांच्या सामानाची तपासणी करण्यासाठी कोटय़वधी रुपये खर्चून ठिकठिकाणी मेटल डिटेक्टर फ्रेम, बॅग स्कॅनर मशीन बसवल्या आहेत. मात्र गेल्या तीन-चार महिन्यांपासून सीएसएमटी स्थानकात लावलेल्या बॅग स्कॅनर मशीन बंद असल्याचे दिसत आहे.
कोणाचाच वॉच नाही
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या गेटवर काही ठिकाणी मेटल डिटेक्टर फ्रेम आहेत. मात्र अनेकदा तेथून स्थानकात येणाऱया प्रवाशांवर वॉच ठेवण्यासाठी कोणीच नसते. त्यामुळे आओ जावो घर तुम्हारा अशीच काहीशी परिस्थिती आहे. दरम्यान, प्रवाशांच्या सुरक्षेवर रेल्वे कोटय़वधी रुपयांचा खर्च करत असून तो केवळ दिखावा असल्याचा आरोप उपनगरीय रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी केला आहे.
रेल्वे म्हणते, लवकरच नवे बॅगेज स्कॅनर लागणार
सीएसएमटी स्थानकात येणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीसाठी असलेले हॅण्ड मेटल डिटेक्टर आणि मेटल डिटेक्टर फ्रेम कार्यरत आहेत, मात्र बॅगेज स्कॅनर बंद असून त्या ठिकाणी नवे बॅगेज स्कॅनर लावण्याबाबतची प्रक्रिया सुरू असून ते लवकरच लागतील, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी दिली.



























































