
छत्तीसगडच्या सूरजपुर जिल्ह्याच्या मानपुर परिसरात एक अनोखी घटना समोर आली आहे. ज्या तरुणावर अंत्यसंस्कार सुरु होते, तोच तरुण घरी जिवंत परतला. त्याला पाहून नातेवाईकांसह ग्रामस्थ थक्कच झाले. मग ज्याच्यावर अंत्यसंस्कार केले तो तरुण कोण होता याचा पोलीस आता शोध घेत आहेत.
दरम्यान, शनिवारी मानपुरनमध्ये एका विहीरीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी आसपासच्या परिसरात मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी सूचना पाठविण्यात आल्या होत्या. दरम्यान चंदरपूर येथील पुरुषोत्तमच्या नातेवाईकांना जेव्हा याबाबत माहिती मिळाली, त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. पुरुषोत्तम दोन दिवसांपासून गायब होता आणि त्याचा शोध सुरु होता.अशावेळी त्यांनी तो मृतदेह आपल्या मुलाचे असल्याचे सांगितले. कुटुंबियांनी मृतदेहाची पाहणी केल्यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करुन त्याचे दफन करण्यात आले. घरात शोकाकुल वातावरण होते. तेव्हा नातेवाईकांनी सांगितले की, पुरुषोत्तम जिवंत घरी परतला. त्याला पाहून कोणाचाच आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. पण तो समोर आल्यावर सर्व गाव चकीत झाले. त्यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. मग तो मृतदेह कोणाचा होता ज्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले असा प्रश्न उपस्थित राहिला.
आता पोलिसांसमोर नवीन आव्हान समोर आले आहे. पोलिसांनी मृताचे कपडे आणि अन्य सामग्री सुरक्षित ठेवली. या आधारावर अज्ञात मृतदेहाची ओळख पटवायला मदत होईल. पोलिसांनी सांगितले की, कुटुंबाची इच्छा असेल तर मृतदेह बाहेर काढून डीएनए तपासणी केली जाऊ शकते. त्याची ओळख स्पष्ट होईल. ही घटना आता संपूर्ण सूरपूर जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली.


























































