
न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांनी आज देशाचे 49 वे सरन्यायधीश म्हणून पदभार स्वीकारला आहे. लळीत कुटुंबात तब्बल शंभर वर्षांपासून वकीली चालत आलेली आहे.
उदय लळीत यांच्या कुटुंबात तब्बल 102 वर्षांचा वकिलीचा वारसा आहे. लळीत यांचे आजोबा, चार काका, वडील वकिली करायचे. उदय लळीत यांचे आजोहा रंगनाथ लळीत हे स्वातंत्र्याच्या आधीपासून वकील होते. त्यांचे वडिल उमेश रंगनाथ लळीत हे देखील महाराष्ट्रातील नामवंत वकील होते. उच्च न्यायालयाचे न्यायधीश म्हणून ते निवृत्त झाले. मुंबईत शिक्षण पूर्ण केल्यानंतर उदय लळीत यांनी दिवंगत ज्येष्ठ वकील एम. ए. राणे यांच्याकडे सुरुवातीची काही वर्षे वकिली केली. नंतर ते दिल्लीला गेले. सहा वर्षे त्यांनी ज्येष्ठ विधिज्ञ सोली सोराबजी यांचे सहकारी म्हणून काम केले.
न्यायमूर्ती लळीत हे देवगड तालुक्याचे सुपुत्र असून गिर्ये- कोठारवाडी येथे त्यांचे मूळ घर आहे. कुलदेवता नृसिंह लक्ष्मीचे मंदिर येथे आहे. आताही आठ ते दहा लळीत कुटुंबीय या गावात वास्तव्य करत आहेत. सुमारे 200 वर्षांपूर्वी काही लळीत कुटुंबीय कुंभवडे, पेंढरी, हरचेरी चुना-कोळवण तसेच रायगड जिह्यातील रोह्याजवळ आपटे या गावांमध्ये स्थलांतरित झाले.





























































