
सामना प्रतिनिधी । बीड
मागील चार-पाच वर्षापासून शिवसंग्राम हा विश्वासू घटक पक्ष म्हणून भाजपासोबत आहे व पुढे सुद्धा आपल्याला एकत्रितपणाने काम करायचे आहे. त्यामुळे आपण कोणत्याही प्रकारची चिंता करू नये. शिवसंग्रामवरील सर्व प्रकारचा अन्याय दूर केला जाईल. येत्या आठ दिवसात बीड जिल्हा परिषदेमधील सर्व संबंधित पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक स्वत: घेवून समन्वयाने मार्ग काढू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसंग्रामचे अध्यक्ष आ. विनायक मेटे व संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले. त्यामुळे जि.प.च्या सत्तेतून शिवसंग्राम सध्यातरी बाहेर पडणार नाही, असे चित्र निर्माण झाले आहे.
मागील आठवड्यात आ. विनायक मेटे यांनी बीड जिल्हा परिषदेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला होता. यापूर्वी त्यांनी पक्षाची राज्यकार्यकारिणीची बैठक बीडमध्ये घेतली होती. मात्र सत्तेतून बाहेर पडण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा करून निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार मंगळवारी (दि.२५) मुंबईत आ. विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसंग्रामच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून चर्चा केली.
यावेळी शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे, शिवसंग्रामचे आ. भारतीताई लव्हेकर, युवक प्रदेशाध्यक्ष उदय आहेर, शिवसंग्राम बीड जिल्हाप्रमुख प्रभाकर कोलंडे, जि.प.गटनेते अशोक लोढा, जिल्हा परिषद सदस्य भारत काळे, विजयकांत मुंडे, पंचायत समिती सभापती ज्ञानेश्वर कोकाटे हे उपस्थित होते. बीड जिल्हा परिषद सत्तेमध्ये सहभागी झाल्यापासून शिवसंग्रामला जि.प.च्या कारभारासंदर्भात भाजपा पदाधिकाऱ्यांकडून अन्याय केला जातो. शिवसंग्रामला निधी उपलब्ध करून देताना आडकाठी आणली जाते. जिल्हा परिषदेमधील धोरणात्मक निर्णयात विश्वासात घेतले जात नाही. शिवसंग्रामला भाजपा पदाधिकाऱ्यांकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक हे सारे विषय आ. मेटे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडून आपल्याला सत्तेत राहाण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट केले.
या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मागील चार वर्षापासून शिवसंग्राम हा विश्वासू घटक पक्ष म्हणून भाजपासोबत आहे. त्यामुळे शिवसंग्राम पदाधिकाऱ्यांनी निश्चिंत राहावे. शिवसंग्रामवरील सर्व प्रकारचा अन्याय दूर केला जाईल. येत्या आठ दिवसात बीड जिल्हा परिषदेमधील सर्व संबंधित पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक स्वत: घेवून समन्वयाने मार्ग काढू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यामुळे तुर्तास तरी शिवसंग्राम बीड जि.प.तून आपला पाठींबा काढणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महत्वाचे हे की, आ. मेटे यांनी गत आठवड्यात सत्ता सोडण्याचा दिलेला इशारा भाजपा पदाधिकाऱ्यांनी कसलाच गांभीर्याने घेतला नव्हता. आता मुख्यमंत्र्यांनीच या प्रकरणात लक्ष घातल्याने शिवसंग्रामला यापुढे तरी सन्मानाची वागणूक मिळते का? हे येणारा काळच ठरवेल.































































