मुख्यमंत्र्यांचे हात दाखवून अवलक्षण! अंकज्योतिषाचा आकडा लागलाच नाही; विरोधकांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंत्रालयातील नियोजित बैठका रद्द करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी शिर्डीला दर्शनासाठी गेले. तिथून अचानक नियोजित कार्यक्रमात बदल करून त्यांनी सिन्नरमध्ये ईशान्येश्वर मंदिरात जाऊन आपले भविष्य जाणून घेतले खरे, पण त्यांचा अंकज्योतिषाचा आकडाच लागला नाही. उलट यावरून एकनाथ शिंदे चांगलेच अडचणीत आले असून मुख्यमंत्र्यांनी हात दाखवून अवलक्षण ओढवून घेतले आहे.

मंत्रालयातील नियोजित बैठका रद्द करून मुख्यमंत्री भविष्य बघायला ज्योतिषाकडे गेले यावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना चांगलेच खडेबोल सुनावले. आम्ही राजकीय लोक कुठेही गेलो तर तेथील स्थानिक देवस्थानांना भेटी देतो. ही आपली परंपरा आहे. त्याबद्दल आपल्या मनात आदर आणि श्रद्धेचे स्थान आहे. तिथंपर्यंत मी समजू शकतो. मात्र, ज्योतिषाकडे जाऊन आपलं भविष्य बघणं कितपत योग्य आहे. 21 व्या शतकात सर्व जग चाललं असताना असं करणे म्हणजे अंधश्रद्धांना खतपाणी घालण्यासारखे असल्याचे अजित पवार म्हणाले.

हे आत्मविश्वास डळमळीत झाल्याचे लक्षण – शरद पवार

दैनंदिन काम सोडून देवदर्शन करणे आणि ज्योतिषाला हात दाखवणे, ही म्हणजे आत्मविश्वासाला धक्का बसल्याची लक्षणे आहेत. जेव्हा आत्मविश्वास डळमळीत होतो तेव्हा लोक अशा गोष्टींकडे वळतात. एकनाथ शिंदे यांच्याबाबतही अशीच परिस्थिती आहे का अशी शंका मला वाटते, असे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवदर्शन किंवा कोणाला हात दाखविण्यासाठी का जात आहेत हे मी काही सांगू शकणार नाही. माझा यावर विश्वास नाही. मी कोणालाही हात दाखवायला जात नाही. पण हल्लीच्या काळात आपण नवीन गोष्टी पाहत आहोत. अशा गोष्टी आजपर्यंत आपण महाराष्ट्रात पाहिल्या नव्हत्या, असा टोला शरद पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लगावला.

निषेधार्ह आणि अत्यंत वेदनादायी – अंनिस

मुख्यमंत्र्यांची ही कृती निषेधार्ह आणि अत्यंत वेदनादायी आहे. पुरोगामी महाराष्ट्रात संविधानिक पदावर बसलेल्या एकनाथ शिंदे यांचे हे वर्तन बेजबाबदारपणाचे असून अंधश्रद्धा निर्मूलन समिती याचा तीव्र निषेध करते, असे अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे म्हणाले.

सरकार तंत्रमंत्रात अडकले

सरकारचे प्रमुख देव, धर्म, तंत्रमंत्र आणि ज्योतिषात अडकले आहेत. त्यामुळेच राज्यावर संकटे येत आहेत. हे सरकार कमजोर आणि दुबळे सरकार असल्यानेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या वर्मावर घाव घातला आहे, असा टोला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

आमचा श्रद्धेवर विश्वास

तंत्रज्ञानाच्या युगात अनेक बदल होत आहेत. अशावेळी विज्ञान काय सांगतंय हे न पाहता पुरोगामी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्योतिष बघतात, यावर काय बोलावं! आम्ही तर हतबलच झालो हे ऐकून. आमचा श्रद्धेवर विश्वास आहे अंधश्रद्धेवर नाही, असे म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांचे कान टोचले.

श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नको

महत्त्वाच्या पदावर असणाऱया लोकांनी श्रद्धा ही ठेवलीच पाहिजे. श्रद्धा असावी, पण अंधश्रद्धा नको. नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रद्धेविरोधात खूप मोठे काम केले. महाराष्ट्रात अंधश्रद्धेबाबत वेगळी मते आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे, असे राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.