हे कुठले घंटाधारी हिंदुत्ववादी…आमचे हिंदुत्व गदाधारी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवहिंदुत्ववाद्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. बिनकामाचे भोंगे वाजवणाऱ्यांना आपण काडीची किंमत देत नाही, असे स्पष्ट करत नवहिंदुत्ववाद्यांचा समाचार घेण्यासाठी आपण लवकरच सभा घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. हनुमान चालिसा पठणासाठी येणार असाल, तर तुमचे स्वागतच आहे. मात्र, येण्याची एक पद्धत असते. तसे आलात तर तुमे स्वागतच करू. मात्र, दादागिरी करून याल तर तुमची दादागिरी कशी मोडायची हे बाळासाहेबांच्या हिंदुत्वाने आम्हाला शिकवले आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठणकावले आहे.

मुंबई महानगरपालिकेचा बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम – बेस्टच्या नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्डचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री ॲड.अनिल परब, पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हयाचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत, मुंबई महानगर पालिकेचे प्रशासक आयुक्त इक्बालसिंह चहल, बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र, बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष आशिष चेंबुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, मेट्रोच्या एका मार्गाचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले आहे. त्यानंतर आज बेस्टच्या नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्डचे उद्घाटन होत आहे.  या दोन्ही गोष्टी अभिमान वाटव्यात अशा आहेत.
आपण फक्त बेस्टचे कौतुक करण्यासाठी आलो आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

आपण मुंबईकर असल्याने येथील परिवहन सेवेतूनच आपला प्रवास झाला आहे. शाळेत जाण्यासाठी आणि येण्यासाठी बसमधून आपण प्रवास केला आहे. आता काळ बदलला आहे. आता बसच्या प्रवासात अनेक बदल झाले आहेत. आजच्या काळात ‘पुढे चला’ हे धोरण गरजेचे आहे. थांबे घ्या, मात्र प्रवास सुरू ठेवा, प्रवास सुरू ठेवणे गरजेचे आहे. बेस्टच्या वाहक- चालकांचे कौतुक आहे. वाहक नेहमी प्रवाशांना पुढे चला, पुढे चला असे सांगतो. ते महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.कोरोना काळात बेस्टने महत्त्वाचे योगदान दिले आहे, याचे त्यांनी कौतुक केले.

मुख्यमंत्री अनेक झाले, अनेक होतील. मात्र, मुख्यमंत्री शब्दाच्या आधी काय बिरूद लागते, ते महत्त्वाचे आहे. आपल्यामागे लोकप्रिय मुख्यमंत्री असे बिरुद लागण्याचे श्रेय जनतेचे आहे. जनता आणि या कर्मचाऱ्यांच्या कार्यतत्परतेमुळेच आपण लोकप्रिय मुख्यमंत्री झालो आहोत, असे ते म्हणाले. आपल्या कामाला जनतेचा आशिर्वाद मिळाला, तरच त्या कामाचे सार्थक होते, असे त्यांनी सांगितले.

या कार्डमुळे सुट्टा पैशांची समस्या सुटली आहे. या कार्डमुळे राजकारणाचे तिकीट वगळता सर्वच तिकीट मिळणार आहेत. या कार्डमुळे मुंबईतील प्रवास सुलभ होणार आहे. विकास करताना आपण पर्यावरण, आरोग्य याचाही विचार करत आहोत. आताचे बसथांबेही आकर्षक झाले आहेत. मुंबईकर कर भरतात, त्याप्रमाणे त्यांना सुविधा मिळायल्या हव्यात, असे आपले मत असल्याचे ते म्हणाले.

शिवसेनेने हिंदुत्व सोडले आहे असा आरोप करण्यात येतो, हिंदुत्व सोडले म्हणजे नेमके काय, ते विरोधकांनी सांगावे.
मला देवळात घंडा बडवणारा हिंदू नको, मला दहशतवाद्यांना बडवणारा हिंदू हवा आहे, असे शिवसेनाप्रमुखांचे मत होते. आपल्याला मंदिरात घंटा बडवणारे हिंदू नकोत, आमचे हिंदुत्व गदाधारी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

हनुमान चालिसा म्हणायची आहे, या आमच्या घरी स्वागतच आहे. मात्र, येण्याची एक पद्धत असते. तसे याला तर स्वागत करू. मात्र, दादागिरी करून याल, तर ती कशी मोडायची, हे आम्हाला शिवसेनाप्रमुखांच्या हिंदुत्वाने शिकवले आहे, असे त्यांनी ठणकावले आहे. तरी कमीज मेरी कमीज से भगवी कैसी, असा सवाल करणारे बनावट नवहिंदुत्ववादी आले आहेत. त्यांच्या समाचार घेण्यासाठी आपण लवकरच सभा घेणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

अनेक उपक्रमांमध्ये बेस्ट अव्वल आहे. ही सेवा कशी सुरू आहे, ते चालवणाऱ्यांनाच माहिती आहे, असेही ते म्हणाले.
राज्याचा विकास बघून अनेकांनी जळजळ-मळमळ होत आहे. ते भोग्यांचा उपक्रम राबवत आहेत. त्यांना आपण फारसे महत्त्व देत नाही. आपण जे काही करतो, ते बेस्टच करतो, हे दाखवण्यासाठी हा कार्यक्रम आहे. त्यांचा समाचार घेण्यासाठी आपण लवकरच सभा घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.