
अतिवृष्टीमुळे उडालेल्या हाहाकारानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः पूरग्रस्त भागांची पाहणी केली. पूरग्रस्त कोकण आणि कोल्हापूरची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगलीतील पूरग्रस्त भागांना भेट देणार आहेत. यावेळी ते सांगलीतील पूरग्रस्तांची भेट घेणार असून त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. त्यांच्या समस्यांची माहिती घेऊन त्यांचे सांत्वन करणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सकाळी 9 वाजता विमानाने कोल्हापूरकडे प्रयाण करणार आहेत. तेथून मोटारीने ते 10.55 वाजता भिलवडी, ता. पलूस येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. अंकलखेप, कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, आयर्वीन पूल, हरभेट रोड येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर सांगलीत पोहोचून दुपारी 1 वाजता प्रशासनासोबत आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर पत्रकार परिषद घेणार असून तिथून कोल्हापूरकडे रवाना होऊन विमानाने ते मुंबईत पोहोचणार आहेत.
































































