Children Vaccination – मुलांचे आजपासून ‘वॉक इन’ लसीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण आज बुधवारपासून पालिकेच्या 12 केंद्रांवर ‘वॉक इन’ पद्धतीने सुरू होत आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना शाळेचे ओळखपत्र किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट दाखविणे अनिवार्य राहणार आहे. कोविन ऍप अपडेट नसल्याने दोन दिवस प्रायोगिक तत्त्वावर मुलांना दुपारी 12 वाजल्यापासून कार्बेव्हॅक्स लसीचे डोस देण्यात येणार आहेत.

मुंबईत 12 ते 14 वर्षे वयोगटाच्या मुलांच्या लसीकरणासाठी पालिकेने आपली यंत्रणा तैनात ठेवली आहे. या लसीकरणासाठी पालिका क्षेत्रातील विविध शाळा, सामाजिक सेवाभावी संस्था, मंडळांचेही सहकार्य घेतले जाणार आहे. 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांच्या त्या त्या भागातील लोकसंख्येनुसार लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. मुलांना दंडावर ही लस देण्यात येणार आहे. पुढील 28 दिवसांनंतर विद्यार्थ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. या वयोगटात सुमारे चार लाख मुलांचा समावेश आहे. मुलांच्या लसीकरणासाठी पालिकेला 1 लाख 22 हजार डोस केंद्राकडून मिळाले आहेत. मुलांना 0.5 मिली डोस देण्यात येणार आहे. आगामी काळात मुलांच्या प्रतिसादानुसार मुलांच्या लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या ठिकाणी होणार लसीकरण

ई विभाग – टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि नायर धर्मादाय रुग्णालय, मुंबई सेंट्रल

ई विभाग – ग्रॅण्ट वैद्यकीय महाविद्यालय व सर जे. जे. समूह रुग्णालय, नागपाडा, मुंबई सेंट्रल

एफ उत्तर विभाग – लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वसाधारण रुग्णालय, शीव (पूर्व)

एफ दक्षिण – राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालय, परळ

एच पूर्व – वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) जम्बो कोविड लसीकरण केंद्र, वांद्रे (पूर्व)

के पूर्व – सेव्हन हिल्स रुग्णालय, अंधेरी-मरोळ (पूर्व)

के पश्चिम – डॉ. आर. एन. कूपर रुग्णालय, विलेपार्ले (पश्चिम)

पी दक्षिण – नेस्को जम्बो कोविड लसीकरण केंद्र, गोरेगाव (पूर्व)

आर दक्षिण – ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मनपा रुग्णालय, कांदिवली (पश्चिम)

आर दक्षिण – ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मनपा रुग्णालय, कांदिवली (पश्चिम)

एन विभाग – राजावाडी रुग्णालय, घाटकोपर (पूर्व)

एम पूर्व विभाग – पंडित मदनमोहन मालवीय रुग्णालय (शताब्दी रुग्णालय), गोवंडी

टी विभाग – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर रुग्णालय, मुलुंड