बापरे! 55 सेकंदांचा व्हिडिओ विकला 5 कोटींना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यू-टय़ूबवर चौदा वर्षांपूर्वी व्हायरल झालेल्या ‘चार्ली बिट माय फिंगर’ या व्हिडिओचा लिलाव तब्बल 5 कोटी रुपयांना झाला आहे. अवघ्या 55 सेकंदांचा हा व्हिडिओ आहे. एनएफटीद्वारे या व्हिडिओचा लिलाव करण्यात आला असून लिलावानंतर हा व्हिडिओ यू-टय़ूबवरून हटवला जाणार आहे.

अमेरिकेतील आयटी कंपनीचे व्यवस्थापक हॉवर्ड डेव्हिस पैर यांनी 2007 साली हॅरी आणि त्याचा छोटा भाऊ चार्ली यांचा हा व्हिडिओ यू-टय़ूबवर शेअर केला होता. यात एक बाळ आपल्या मोठय़ा भावाच्या मांडीवर बसलं असून ते आपल्या मोठय़ा भावाचं बोट चावत आहे. बाळानं बोट चावल्यावर मोठा भाऊ हसत ‘चार्ली बीट माय फिंगर’ असं सांगत आहे. त्यानंतर ते बाळ पुन्हा त्याचं बोट जोरात चावताना दिसत आहे. आजवर या व्हिडिओला जवळपास 88 कोटी ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओनं दोन्ही भावांना इंटरनेटवर हिरो केलं. या व्हिडिओला अनेक जाहिराती मिळाल्या आणि यातून मागील काही वर्षांत लाखोंची कमाई झाली. या व्हिडिओमध्ये दिसणारी लहान मुलं आता मोठी झाली आहेत. हॅरी आता सहा फूट उंच झाला आहे. पंधरा वर्षीय चार्लीही सध्या शिक्षण घेत आहे.