
आध्यात्मिक जगतात ‘पैजारवाडी’क्षेत्राची ओळख दृढ करणाऱया ‘श्री चिलेमहाराज’ या सिद्धसत्पुरुषाच्या पूर्वायुष्याचा परिचय.
15 ऑगस्ट 1922. पारतंत्र्यात खितपत पडलेला हिंदुस्थान स्वतंत्र होण्यास अजून 25 वर्षांचा अवकाश होता, त्याआधी कोल्हापूर परिसरातील पन्हाळ्याजवळ ‘जेऊर’ येथे माऊलीच्या गर्भवासात बंदिस्त झालेले एक दिव्य तेजस्वी बालक जन्माला येत नव्या जगातील पहिला श्वास स्वतंत्रपणे घेते झाले. पुढे या बालकाने अध्यात्मजगतामध्ये आपल्या जन्मभूमीचे नाव आभाळाएवढे मोठे व अजरामर केले.
गोकुळाष्टमीच्या शुभयोगाचे औचित्य साधून जन्मलेल्या या बालकामुळे ‘जेऊर’ येथील भैरूजी बुराण यांच्या घरात पराकोटीचा आनंद पसरला. कोल्हापूरकर दत्तात्रय चिले यांची पत्नी आणि भैरूजी बुराण यांची मुलगी मंजाबाई बाळंतपणासाठी माहेरी, ‘जेऊर’ येथे आली. नवजात बालकाचा जन्म जरी गोकुळाष्टमीच्या दिवशी झाला तरी त्याचे नाव मात्र ‘शंकर’ असे ठेवण्यात आले. पुत्रप्राप्तीनंतर अल्पावधीतच मंजाबाईंचे निधन झाले. आईविना पोरका झालेला शंकर जन्मानंतर काही काळ आजोळी वास्तव्यास असला तरी पुढे मात्र त्याला त्याच्या वडिलांनी कोल्हापुरात, त्यांच्या शनिवारपेठेतील राहत्या घरात आणले. कौटुंबिक गोतावळ्यात रमलेल्या शंकरचे प्राथमिक शिक्षण खासगी शाळेत, पाचवी ते सातवीपर्यंतचे शिक्षण राजा शिवाजी विद्यालयात आणि आठवी ते मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पाटणकर हायस्कूलमध्ये झाले.
मातृवियोगाची सल मनात बाळगणारा शंकर बालपणापासून अबोल होता. ‘संकोच’ हा स्थायिभाव असला तरी शाळेच्या स्काऊट बँड पथकामध्ये उत्तम बासरी वाजविणाऱया तसेच स्वच्छता व टापटीपपणाची आवड राखणाऱया शंकरने शाळेत कधीही दंगामस्ती केली नाही. उलट अवतीभोवती कुणी दंगेखोरपणा करीत असेल तर तो गूढ शब्दांत ‘नो दंगा मॅड बॅड’ असे पुटपुटत असे. एकांतप्रिय, कुणांत फारसा न मिसळणारा, कुणी त्याच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केल्यास त्याला ‘अरं! तुझ्या मनात, अरं! माझ्या मनात… सांगायचं काय ते साऱया जगात’ असं गूढ आणि विचित्र उत्तर देत शंकर गप्प करीत असे. अशातच बरीच वर्षे सरली. पुढे दुर्दैवाने, मॅट्रिकच्या वर्गात असताना शंकरच्या वडिलांचे, दत्तात्रय चिले यांचे निधन झाले आणि त्यातच मॅट्रिकच्या परीक्षेत शंकरच्या पदरी अपयश आले तेव्हा अबोल वृत्तीचा शंकर स्वतःचा शर्ट फाडीत शाळेबाहेर पडला आणि कुणास न सांगता-सवरता तिथून निघून गेला. या काळात त्याचे वास्तव्य पंचगंगेच्या ऐल अन् पैलतीरावर असलेल्या पाटीलबाबा अन् श्रीसिद्धेश्वरमहाराज यांच्या समाधीपाशी झाले. हा पंचवीस दिवसांचा काळ ‘शंकर दत्तात्रय चिले’ या तरुणाचे रूपांतर पुढे ‘श्री चिले महाराज’ या संबोधनाने होण्याकरिता पुरेसा होता. पुढील काळात श्री चिले महाराज वारंवार पाटील समाधी आणि श्रीसिद्धेश्वर महाराज यांच्या समाधिस्थळी जात तसेच या स्थानांविषयी विशेष ममत्व आणि आदरभाव दाखवीत असत.
पन्हाळ्यानजीक जेऊर, पैजारवाडी आणि कोल्हापूर येथील परिसरात पायाला भिंगरी लावल्यागत मुक्त संचार हे श्री चिले महाराजांच्या अवतारकार्याचे पहिले दृश्य स्वरूप. बालवयात अबोल असलेले हे परमेश्वरीय तत्त्व पुढे मात्र त्यांच्या गूढ अन् देवदत्त वाचासिद्धीमुळे सर्वत्र सर्वदूर प्रसिद्धीस आले. भैरवनाथ मंदिर, त्र्यंबोलीमाता अर्थात टेंबलाईदेवी, मसाईदेवी, वाडीचा नरसोबा यांच्यासोबत राजगुरू श्री सिद्धेश्वरबुवा, पूज्य गराडेबाबा आणि पूज्य पाटीलबाबा यांच्या समाधीस्थानी नित्यनेमाने जाणारे व भक्तांनाही त्या स्थानांवर नेऊन अलौकिक प्रचीतीचा अनुभव प्राप्त करून देणारे श्री चिले महाराज अल्पावधीतच त्यांच्यातील अद्भुत ईशतत्त्वाचा आणि सद्गुरुतत्त्वाचा प्रत्यय देते झाले.
प्रारंभिक काळात जनसामान्यांपासून दूर राहणारे श्री चिले महाराज पुढे भक्तगणांच्या गर्दीत दिसू लागले. त्यांच्या कृपेची प्रचीती ज्यांना वारंवार लाभली ती भक्तमंडळी कायम या ‘चिले’देवाच्या अवतीभवती दिसू लागली. जनव्यवहार, व्यवसाय, कुटुंब, प्रपंच यांपासून कोसो मैल दूर असलेले अन् स्वैर-स्वच्छंदी-विदेही-अवधूतवृत्तीचे प्रसंगोत्पात दर्शन घडविणारे चिलेदेव लग्नबंधनात अडकले नाहीत मात्र त्यांनी तहानभूक, झोप-विश्रांती यांची तमा न बाळगता त्यांच्या भक्तांचा प्रपंचमार्ग निगुतीने सांभाळला. लौकिकार्थाने लाभलेला मानवी देह भक्तकल्याणार्थ कष्टविला. विविध प्रकारचे शारीरिक त्रास व हालअपेष्टा सहन करून चिलेदेवांनी त्यांच्या भक्तांचे मनोबल उंचावले, त्यांना सक्षम केले आणि विविध प्रकारच्या संकटातून बाहेर काढले. म्हणूनच, पुढे सर्व जातिधर्माची मंडळी चिलेदेवांच्या चरणी लीन झाली.
श्री चिले महाराजांचे विक्षिप्त वर्तन, बेबंद स्वैरवृत्ती, कृतककोप हा केवळ बाह्य देखावा होता, मात्र प्रत्यक्षात त्यांच्यात ‘देव’वृत्ती विलसत होती हे एव्हाना सर्वांनाच कळून चुकले. चिलेदेवांच्या नित्यनव्या अतर्क्य आणि अद्भुत लीला अनुभवण्यास मिळाल्यामुळे तसेच त्यांच्या वरकरणी गूढ आणि असंबद्ध बोलण्यामागचा खरा भावार्थ अन् अन्वयार्थदेखील प्रत्ययास येऊ लागल्यामुळे चिलेदेवांची प्रसिद्धी कोल्हापूर शहराची वेस ओलांडून सर्वदूर पोहोचली. चिलेदेवांच्या कृपेचे अनुभव अक्षरशःविलक्षण, अतर्क्य अन् कल्पनेच्या पल्याड जाणारे आहेत.
‘निरंजनावधूत निरामय सिद्धसत्पुरुष’ नेमका कसा असतो हे जर कुणाला पडताळून पाहायचे असेल तर त्यांनी श्री चिलेदेवांचे चरित्र अभ्यासावे. बाबूराव अथणे यांचे ‘परब्रह्मगुरू चिलेदेव’ आणि डॉ. बाबासाहेब गुप्ते यांचे ‘चंदनीसुगंध’ या दोन विस्तृत चरित्रग्रंथांमध्ये अथणे आणि गुप्ते यांचे चिलेदेवांविषयी स्वतः घेतलेले दिव्यानुभव आहेत. श्रीपाद कशाळकर लिखित ‘मी पैजारचा दास’ व ‘चिलयानंद’ या ग्रंथात चिलेदेवांच्या अवतारकार्यातील आठवणींचे संकलन आहे. त्याचप्रमाणे विजया गाट लिखित ‘परब्रह्मसद्गुरू श्री चिले महाराज’ या अल्पपरिचयात्मक ग्रंथामध्ये चिलेदेवांच्या अवतारकार्याचा आलेख अतिशय विस्तृत आणि अभ्यासात्मक पद्धतीने मांडलेला आहे.
चिलेदेवांच्या अवतारकार्याचे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांचे परमेश्वरानुसंधानात अखंड रंगून जाणे, दंग होणे. चिलेदेवांना भजनानंदात रममाण होणे आवडत असे. परमेश्वरानुसंधानात दंग होण्याचा हा त्यांचा आवडता मार्ग होता. स्वतः भजन करणे व भक्तांकडून करवून घेणे चिलेदेवांना विलक्षण प्रिय होते. ‘शिर्डी माझे पंढरपूर, दत्तच माझे पंढरपूर’, ‘झाला महार पंढरीनाथ’, ‘विसरू कसा मी गुरुपादुकांना’, ‘हे भगवंता दीनदयाळा, शरण मी आलो तुला’, ‘नामाचा बाजार पंढरी’, ‘पाटील पाटील किती तुझे नाव मी सांगू’ या आणि अशा विविध भजनांमधून चिलेदेव, परमेश्वर अन् सद्गुरूंचा आठव करीत भजनानंदामध्ये तल्लीन होत. त्यांनी पैजारवाडीच्या पुण्यभूमीत बसून म्हटलेले ‘या या जागेचा महिमा। गोकुळ उतरले रामा।’ हे भजन आज प्रत्यक्ष पाहावयास मिळते. अवधूतवृत्तीचा सत्पुरुष असतो तरी कसा? याचा प्रत्यय चिलेदेवांच्या या दुर्मिळ रेकार्ंडगद्वारे जाणून घेता येतो. हा खऱया अर्थाने अलौकिक सद्गुरूसंचिताचा ‘अमूल्य’ ठेवा आहे.
>> विवेक दिगंबर वैद्य
[email protected]


























































