Corona Virus रुग्णांची झपाट्याने वाढ, चीन 10 दिवसांत नवे रुग्णालय बांधणार

2104

कोरोना व्हायरसच्या वाढत्या रूग्णांमुळे चीन सरकारने 10 दिवसांत 1000 खाटांचे रुग्णालय बांधण्याची घोषणा केली आहे. कोरोना व्हायरस सर्वात जास्त चीनमधील वुहान शहरात पसरला आहे. त्यामुळे हॉस्पिटल या शहराच्या बाहेर बांधण्यात येणार आहे. या अगोदर 2003 ला सार्स या व्हायरसच्या रुग्णांना हाताळण्याकरीता देखील १० दिवसांत हॉस्पिटल बनविले होते. त्याच कंपनीला सध्याचे रुग्णालय बनवण्याचे काम देण्यात आले आहे. हे रुग्णालय फक्त कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांसाठी बांधण्यात येत आहे. हे रुग्णालय फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार असून इथे तत्काळ रुग्णांवर उपचाराला सुरूवात होणार आहे.

चीनमधल्या वुहानमध्ये कोरोना व्हायरसच्या रूग्णांची संख्या ही सातत्याने वाढत चालली आहे. चीनमध्ये साडेआठशे पेक्षा जास्त लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. गेल्या 6 दिवसांत दोन शहरे वगळल्यास कोरोना व्हायरस मोठ्या प्रमाणावर पसरला आहे. हॉस्पिटल बनवण्याच्या कामाला सुरवात झाली असून, हजारो कर्मचारी लवकरात लवकर हॉस्पिटल उभे राहावे यासाठी दिवसरात्र झटत आहेत.

कोरोना व्हायरसची लागण झाल्याची पहिली घटना 31 डिसेंबर रोजी उघडकीस आली होती. हा आजार 2003 मध्ये पसरलेल्या सीव्हिअर अॅक्यूट रेसिपिरेट्री सिंड्रोम म्हणजे सार्स सारखाच धोकादायक असल्याचे मानले जाते. वुहान मधील लोकांना घर सोडून जाऊ नये अशी सूचना दिली असून, तेथे येणाऱी – जाणाऱी सर्व विमाने व रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.चीनमध्ये शुक्रवारपर्यंत कोरोनाव्हायरसच्या 857 रुग्णांची नोंद झाली असून, त्यातील 26 लोकांचा मृत्यू झाला आहे. चीन व्यतिरिक्त कोरोना व्हायरसची लागण झालेले रुग्ण हे अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम, थायलंड, हाँगकाँग, मकाऊ आणि तैवानमध्ये आढळून आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या