
कोरोनाचे जन्मठिकाण चीनच असल्याचा दावा सिद्ध करणारे नवनवीन निष्कर्ष समोर येत आहेत. वुहानच्या प्रयोगशाळेत माकड, सशांबरोबर 1 हजारहून अधिक प्राण्यांची जनुके बदलण्यात आली. या प्राण्यांना दिलेल्या इंजेक्शनच्या सामग्रीतून कोरोनाची उत्पत्ती झाली व येथूनच कोरोना जगभर पसरला, असा दावा ब्रिटिश पत्रकार जॅस्पर बेकर यांनी केला आहे. अनेक वैज्ञानिकांच्या मतांच्या आधारे त्यांनी हा दावा केला आहे. त्यामुळे चीनला आता कोरोना उत्पत्तीची वस्तुस्थिती लपवणे फार मुश्कील बनणार आहे.
बेकर हे चीनमध्ये अनेक वर्षे राहिलेले आहेत. त्यांनी चीनच्या मीडियामध्ये कोरोना उत्पत्तीसंबंधी प्रसिद्ध झालेल्या लेखांच्या आधारे एक अहवाल जारी केला आहे. त्यात त्यांनी चीनच्या खोटेपणाची पोलखोल केली आहे. विशेष म्हणजे, त्यांचा अहवाल चीनच्या स्थानिक मीडियाने मोठी बातमी म्हणून प्रसिद्ध केला आहे. वुहान प्रयोगशाळेत जेनेटिक इंजिनीअरिंगच्या मदतीने 1 हजारहून अधिक प्राण्यांची जनुके बदलण्यात आली. चीनच्या प्रयोगशाळांमध्ये इतर देशांमध्ये बंदी असलेले घातक आणि बेकायदेशीर प्रयोग केले जात आहेत. एवढेच नव्हे, तर मनुष्यावरही प्रयोग केले जात आहेत. अनेक देशांमध्ये मनुष्यांवरील प्रयोग अनैतिक मानले जातात. मात्र चीनच्या प्रयोगशाळांत या प्रयोगांचा अतिरेक केला जात असल्याचे बेकर यांनी अहवालात नमूद केले आहे.
प्रयोगशाळेवर सैन्याची देखरेख; विज्ञानाच्या क्षेत्रात आघाडीचे स्वप्न
वुहानच्या प्रयोगशाळेवर पीपल्स लिबरेशन आर्मी अर्थात चिनी सैन्यामार्फत नियंत्रण ठेवले जात आहे. कोरोना हा नैसर्गिक विषाणू असल्याचा कुठलाही ठोस पुरावा नाही. चिनी वैज्ञानिकांना विज्ञानाच्या क्षेत्रात आघाडी मिळवायची होती. चीनच्या याच खटाटोपाचा संपूर्ण जगाला तडाखा बसला. कुठलाही नैसर्गिक विषाणू इतक्या झपाटय़ाने म्युटेंट होऊ शकत नाही, असा दावा ब्रिटिश वैज्ञानिकांनी केला आहे.
चीनच्या खोटेपणाचे पुरावे
- वुहान व इतर प्रयोगशाळा जैवसुरक्षेसंबंधी संशोधनासाठी उभारल्याचा दिखावा चीन करीत आहे. प्रत्यक्षात येथे जिवंत प्राण्यांवर प्रयोग केले जातात. प्राण्यांच्या सुरक्षेचेही देणेघेणे नसते. टेस्ट टय़ुबमध्ये ठेवलेल्या रोगी जिवांना पाहून माकडे पळण्याचा, चावण्याचा आणि ओरखडण्याचा प्रयत्न करतात.
- वुहान सेंटर फॉर डिसीज पंट्रोल अॅण्ड प्रिव्हेन्शनने आपल्या प्रयोगशाळेत आजारी प्राणी ठेवले आहेत. यात जवळपास 605 वटवाघळे आहेत. ही वटवाघळे वैज्ञानिकांवर हल्लेही करीत असल्याचे आढळले आहे.
- विषाणूशास्त्रज्ञ शी झेंगली यांनी चीनच्या अनेक गुंफांमध्ये वटवाघळांचा शोध घेतला होता. तसेच काही उंदरांना विषाणूचे इंजेक्शन दिले होते. चीनमध्ये त्यांची ‘बॅट वुमन’ म्हणून ओळख आहे. त्यांनीच व्यूहांच्या प्रयोगशाळेमध्ये कोरोना विषाणू तयार केल्याची दाट शक्यता आहे.





























































