चीनमधील सर्वात धनाढ्य व्यक्ती जॅक मा बेपत्ता, थेट राष्ट्रपतींशी घेतला होता पंगा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरातील कोट्यवधी तरुणांचे आदर्श असलेले चीनमधील सर्वात धनाढ्य व्यक्ती, अलिबाबा समूहाचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष जॅक मा बेपत्ता आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांची काहीही खबर नसल्याचे समोर आले आहे. चीनच्या सरकारी संस्थांच्या काम करण्याच्या पद्धतीवर सवाल उपस्थित करत त्यांनी थेट राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी पंगा घेतला होता. यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

जॅक मा यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सरकारी धोरणावर टिका केली होती. तसेच जागतिक बँकिंग नियमांना ज्येष्ठ नागरिकांचा क्लब असे म्हणत खिल्लीही उडवली होती. यासह चीनच्या व्याजखोर वित्तीय नियम आणि सरकारी बँकांच्या कार्यप्रणालीवर सडकून टीकेसह त्यांनी चिनी सरकारवरही त्यांनी कठोर शब्दात तोफ डागली होती.

जॅक मा हे त्यांच्या स्वत:च्या ‘आफ्रिकाज् बिझनेस हिरोज’ या कार्यक्रमाच्या अंतिम सामन्यासाठी उपस्थित नसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. जॅख मा हे या कार्यक्रमाच्या अंतिम फेरीसाठी प्रशिक्षक म्हणून उपस्थित राहणार होते. मात्र त्यांच्या जागी अलिबाबा कंपनीच्या अन्य एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या कर्यक्रमाला उपस्थिती लावली. हे सर्व प्रकार नोव्हेंबर महिन्यामध्ये घडल्याचे युनायटेड किंग्डममधील टेलीग्राफने आपल्या वृत्तात म्हटले आहे. तसेच कंपनीचे संस्थापक असणाऱ्या जॅक मा यांचा फोटोही वेबसाईटवरुन काढून टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

राष्ट्रपतींच्या आदेशानंतर कारवाई

नोव्हेंबर महिन्यात चिनी अधिकाऱ्यांनी जॅक मा यांच्यावर कारवाई करत धक्का दिला होता. जॅक मा यांच्या एंट ग्रुपचे 37 अब्ज डॉलर्सचे आयपीओ सरकारने निलिंबित केले. ‘वॉल स्ट्रीट जनरल’च्या अहवाला नुसार, जॅक मा यांच्या एंट ग्रुपचे आयपीओ रद्द करण्याचे आदेश थेट चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या वतीने देण्यात आले होते. त्यानंतर जॅक मा यांना ख्रिसमसच्या आदल्या दिवशी देशाबाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली.