एअर इंडियाच्या विमानात घुसले टॉयलेटचे पाणी, जिकडे तिकडे पसरली दुर्गंधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

एअर इंडियाच्या लंडनहून दिल्लीला येणाऱया विमानाचे टॉयलेट तुंबल्यामुळे विमानात सगळीकडे घाणेरडे पाणी पसरले. त्यामुळे जिकडे तिकडे दुर्गंधी पसरली. इकॉनॉमी केबिनच्या कारपेटवरही टॉयलेटमधले सर्व मलयुक्त पाणी पसरले होते.

विमान प्रवाशांनी खचाखच भरले नव्हते त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली नाही. ज्या ठिकाणी हे पाणी पसरले नव्हते अशा ठिकाणी प्रवाशांना जागा देण्यात आली. विमानातील कर्मचाऱयांनी कार्पेटवर विमानातील ब्लँकेट आणि कागद पसरवून घाणेरडे पाणी रोखण्याचा प्रयत्न केला. 9 फेब्रुवारी रोजी एअर इंडिया 112 या विमानाने लंडनच्या हिथ्रो विमानतळावरून दिल्लीला उड्डाण घेतले. त्यानंतर एका प्रवाशाच्या चुकीमुळे ही घटना घडल्याचे एअर इंडियाच्या अधिकाऱयांनी सांगितले.

म्हणून तुंबले टॉयलेट
टॉयलेट नेमके का तुंबले याचा शोध घेण्याचा कर्मचाऱयांनी प्रयत्न केला. तेव्हा एका प्रवाशाच्या चुकीमुळे टॉयलेट तुंबले असे समजले. टॉयलेटच्या डाव्या बाजूला एक टॉवेल ठेवला होता. त्याने हा टॉवेल तिथे असतानाच फ्लश करण्याचा प्रयत्न केला. फ्लशमध्ये टॉवेल अडकल्यामुळे टॉयलेट तुंबल्याचे एअर इंडियाच्या अधिकाऱयांनी सांगितले.