चौकमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; बंगल्याच्या शेडचे पत्रे उडाले, मुंबई-पुणे महामार्गावर पडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बंगला झाकून ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या बेकायदा महाकाय शेडचे पत्रे वादळी वाऱ्यासह झालेल्या तुफान पावसात उडून थेट मुंबई-पुणे महामार्गावर येऊन पडले. सुदैवाने त्यावेळी महामार्गावर कोणतेही वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला. हा प्रकार शनिवारी सायंकाळी चौक परिसरात घडला. अचानक महामार्गावर पत्रे आल्यामुळे प्रचंड वाहतूककोंडी झाली. वाहनांच्या रांगा थेट चार किलोमीटरपर्यंत गेल्या. शेडचे उडालेले पत्रे, विजेचे खांब आणि काही झाडांवरही अटकले आहेत.

चौक येथे बन्सल नावाचा मोठा बंगला आहे. या बंगल्याला पूर्ण झाकून ठेवण्यासाठी प्रचंड मोठी पत्र्याची शेड उभी करण्यात आली होती. शनिवारी सायंकाळी या भागात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस पडला. त्यावेळी या शेडचे पत्रे उडून साधारण चार किलोमीटर अंतरावर असलेल्या माळरानावर विखुरले. काही पत्रे उडून थेट मुंबई-पुणे महामार्गावर पडले. काही पत्र्यांनी नारळाची, सुपारीचे झाडे कापून काढली तर वीजपुरवठा करणारे विद्युत खांब व वाहिन्यांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान केले. मुंबई-पुणे महामार्गावर पत्रे पडल्याने दोन्ही मार्गिकांवर प्रचंड वाहतूककोंडी झाली. सामाजिक कार्यकर्ते रामदास काईनकर यांनी या दुर्घटनेची माहिती आयआरबी कंपनीचे व्यवस्थापन आणि पोलिसांना दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार, उपकार्यकारी अभियंता महादेव मुंडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.

कारवाईची मागणी

सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र अशा प्रकारचे अनेक बेकायदा शेड या भागात तयार करण्यात आले आहेत. वास्तविक पाहता या शेडसाठी एमएसआरडीसीची परवानगी आवश्यक आहे. मात्र अनेक शेड हे परवानगी न घेता उभे करण्यात आले आहेत. शनिवारी घडलेल्या दुर्घटनेप्रकरणी संबंधित बंगला मालकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.