सिनेमा – चंद्रासोबतचा काव्यमय प्रवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>प्रा. अनिल कवठेकर

चंद्राच्या सगळय़ा कला गीतकारांनी गाण्यांमध्ये रेखाटलेल्या आहेत. ‘आधा चांद’, ‘चौदहवी का चांद’, ‘पूनम का चांद’ वगैरे. कारण सगळय़ा गीतकारांचं चंद्रावर आणि चांदण्यांवर खूप प्रेम असल्याचं जाणवतं. आईसुद्धा आपल्या बाळाबद्दल कौतुक सांगताना चंद्र-ताऱयांची मदत घेते. चंद्रासोबत बालगीतंही आहेत तशीच तत्त्वज्ञानाची गाणीसुद्धा आहेत. कव्वालीमध्येही चंद्र आहे. इतका चंद्र आपल्या संस्कृतीमध्ये सौंदर्याचं रूपक म्हणून सामाविष्ट झाला आहे. अशा चंद्रासोबतची ही काव्यमय झलक…

चंद्र आणि चांदण्यांसोबत प्रेमाच्या गावा प्रवास करताना त्यामध्ये लटके आणि झटके असणारा शम्मी कपूर त्याच्या लटक्या-झटक्यासह आठवला,

ये चांद सा रोशन चेहरा, जुल्फो का रंग सुनेहरा
हे झील सी नीली आखे, कोई राज है इसमे गहरा
तारीफ करू क्या उसकी जिसने तुझे बनाया…

सौंदर्याचे असे वर्णन करणारा शम्मी कपूर नायिकेच्या रूपाची तारीफ करत तिला रूपवती बनवतो. कश्मीरची कली शर्मिला टागोरसह तिथल्या सुप्रसिद्ध दाल लेकमध्ये छोटय़ा-छोटय़ा होडय़ांमध्ये नाचणाऱया कश्मीरच्या तरुणी आणि एका होडीमध्ये आपल्या अंगाला वेगवेगळ्या पद्धतीने झटके देत गाणारा शम्मी कपूर या गाण्याला जिवंत करून टाकतो. त्या काळातल्या गाण्यांची आणि अभिनेत्यांची स्वतची एक स्टाइल होती, जी आता हरवत चालली आहे.

बहुतांशी गाण्यांमध्ये चंद्राला मानवी रूप देऊन मानवी भावभावनांमध्ये त्याला गुंतवून चेतनगुणोत्ती अलंकार साधताना गीतकार दिसतात. या गाण्यात ती म्हणते, चंद्र आणि चांदण्या माझ्या घरी येऊन मला सांगत आहेत की, प्रेम कर आणि गाणे आहे…

चांदने कुछ कहां रात ने कुछ सुना
तू भी सुन बेखबर प्यार कर, हो हो प्यार कर

गीतकाराच्या कल्पना रूपेरी शब्दांतून आपल्याला अर्थाच्या आनंदाचा सुगंध देत असतात.

तिच्या चेहऱयासाठी चंद्राचीच उपमा अनेकदा आलेली आहे. या गाण्यातही तशीच उपमा आलेली आहे,

चेहरा है या चाँद खिला है, जुल्फ घनेरी छाव है क्या
सागर जैसी आंखोवाली,
ये तो बता तेरा नाम है क्या…

चंद्रासारख्या उमललेल्या चेहऱयाचं नाव काय असावं? असा प्रश्न नायकाला पडलेला आहे. जिचे डोळे सागरासारखे आहेत आणि जिच्या मोकळय़ा केसांच्या सावलीत आपण असावे अशा कल्पनेनेसुद्धा मूड रोमॅण्टिक होतो.

चांदनी रात है तू मेरे साथ है
कुछ हवा सर्द है दिल में दर्द है
लब पे कोई बात है…

हे अभिजीतने गायलेलं गाणं नायकाच्या मनातील प्रेममय भावना शब्दांतून व्यक्त करू लागतं. आपल्या सोबतीला ती आहे, दोघांच्या सोबतीला चांदण्यांनी भरलेले आकाश आहे, हवेत गारवा आहे आणि मनात प्रेमभाव आहेत.

पूर्ण चंद्र तसा अनेक गाण्यांमध्ये आलेला आहे. कविकल्पनेनुसार पूर्ण चंद्राच्या आधीचा दिवस म्हणजे पौर्णिमेच्या आधीचा दिवस. त्या चंद्रालाही सौंदर्याच्या जगामध्ये एक वेगळाच अर्थ आहे. त्या आशयाचे गीत जे आपल्या सगळय़ांच्या ओठांवर आहे,

चौदहवी का चांद हो या आफताब हो
जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो…

तिला पाहून नायकाला तिच्या सौंदर्याचं तेज सूर्यासारखं भासतंय. हिंदुस्थानी सौंदर्याचं प्रतीक असलेली वहिदा रहमान समोर असताना ते शब्दही खूप सुंदर होतात.

चौदा दिवसांच्या अर्धचंद्राचेही एक वेगळं सौंदर्य आहे. ज्याला आपण चंद्राची कोर म्हणतो, ती चंद्रकोर काही स्त्रिया कुंकू म्हणून कपाळावर लावतात. त्या अर्ध्या चंद्राला घेऊन लिहिलेले गाणे आहे,

आधा है चंद्रमा रात आधी
रह ना जाये तेरी मेरी
बात आधी, मुलाकात आधी…

चंद्राच्या सगळय़ा कला गीतकारांनी गाण्यांमध्ये रेखाटलेल्या आहेत. कारण त्या गीतकारांचं त्या चंद्रावर तेवढंच प्रेम आहे हे जाणवतं.

लग्नाळू वयात प्रत्येक तरुणाला आपली होणारी पत्नी सुंदर असावी असं वाटतं. ती चंद्रासारखी सुंदर असावी ही सामान्य माणसाच्या मनातली भावना गीतकार शब्दबद्ध करताना शब्द वापरतो,

चांदसी मेहबूबा हो मेरी कब ऐसा मैने सोचा था
हां तुम बिलकुल वैसी हो जैसा मैने सोचा था…

ज्याने स्वप्न पाहिले आणि त्याचे स्वप्न पूर्ण झाले असे काही भाग्यवान असतात, पण सगळेच काही इतके भाग्यवान नसतात.

एक झलक जो पाता है राही वही रुक जाता है
देख के तेरा रूप सलोना चांद भी
सर को झुकाता है…

एक क्षण पाहून पाहणारा तिथल्या तिथे थिजून जातो असं तुझं सौंदर्य आहे. तुझ्यासमोर तो आकाशातला चंद्रसुद्धा नतमस्तक होऊन तुझ्या सौंदर्याला सलाम करतो. सौंदर्याला एका उंचीवर नेताना गीतकाराने आकाशातल्या चंद्राला धरतीवर आणले आहे.
जावेद अख्तर यांनी अनेक अप्रतिम गाणी दिली आहेत. आर. डी. बर्मन संगीतकार म्हणून असलेला शेवटचा चित्रपट ‘1942 – ए लव्ह स्टोरी’ यातल्या एका गाण्यात उपमांची जणू खाणच आहे. त्या गाण्याचं वैशिष्टय़ असं की, नायिकेला पाहून नायकाच्या मनात येणारे कोमल, शुद्ध, सात्त्विक, पवित्र भावना सादर करणारे हे गीत आहे.ज्यात उपमांचा झरा सहजपणे वाहतो. एका कडव्यामध्ये सात उपमा आहेत आणि अशी तीन कडवी आहेत. म्हणजे 21 उपमा आहेत.

ओ एक लडकी को देखा तो ऐसा लगा
जैसे खिलता गुलाब जैसे शायर का ख्वाब
जैसे उजली किरन जैसे बन मे हिरन
जैसे चांदनी रात जैसे नगमे की बात
जैसे मंदिर मे हो कोई जलता दिया…

ती म्हणजे उमललेला गुलाब, एका कवीचं स्वप्न, अंधाराला चिरत येणारा सकाळचा कोवळा प्रकाश, वनामध्ये स्वच्छंदपणे विहार करणारी हरिणी, चांदण्यांची रात्र, काव्यांची मैफल आणि मंदिरात शांतपणे जळणारा दिवा…उपमांची उधळण करताना जावेदजींनी चंद्र आणि चांदण्यांनाही गीतात आणले आहे.

ये रात भीगी भीगी ये मस्त फिजाये
उठा धीरे धीरे ओ चाँद प्यारा प्यारा
क्यू आग सी लगा के गुमसुम है चांदनी
सोने भी नही देता मौसम का ये इशारा…

राज कपूर आणि नर्गिसच्या प्रेमकथेला साकार करणारे शब्द, त्यांच्या अभिनयाच्या प्रतिभेत पावसाने भिजलेले शब्द आणि त्या शब्दकळय़ा व फुलांची श्रोत्यांवर होणारी बरसात, अशी अनुभूती हे गीत पाहताना आणि ऐकताना होते. शब्दांची रचना किती सुंदर आहे. ही रात्र ओली आहे. आकाशात चंद्र डोकवायला लागला आहे. पाऊस नाही तरी रात्र ओली आहे. दोघांच्या प्रेमाने ती न्हाऊन निघालेली आहे. हृदयात प्रेमाची समई पेटवणारी चांदणी मात्र नामानिराळी झाली आहे. वातावरणही प्रेममय खाणाखुणा करत आहे. ज्यामुळे झोप येत नाही. ही प्रेमाची अस्वस्थता प्रेमिकांने नक्कीच अनुभवली असेल.

एखादं गाणं सहजपणे देशकाल परिस्थितीवर भाष्य करत जातं आणि आपल्या मनातही त्या गाण्यातील विचार उमटू लागतात.

आ चल की तुझे मैं लेके चलू
एक ऐसे गगन की तले
जहाँ गम भी ना हो, आसू भी ना हो
बस प्यार ही प्यार पले,
सूरज की पहली किरण से
आशा का सवेरा जागे
चंदा की किरण से धुलकर घनघोर अंधेरा भागे…

देशाला अशा विचारांच्या गाण्यांची आणि त्या विचारांप्रमाणे वागणाऱया नागरिकांची गरज आहे. नायक एक अशा आकाशाच्या शोधात आहे जिथे दुःख, अश्रू नसेल तर फक्त प्रेम असेल. सूर्याच्या पहिल्या किरणाने रोज नव्या आशेची पहाट उगवत असेल. दुष्ट, कपटी विचारांचा गडद काळोख चंद्राच्या प्रेमळ किरणांनी धुतला जात असेल, असा आशावाद सांगणारं हे गीत आहे. त्या अंधाराला धुण्याची जबाबदारी चंद्रावर व त्याच्या किरणांवर सोपवणारा विचार मांडताना गीतकारांच्या हाताशी चंद्र असतोच.

चंद्रासोबत केवळ प्रेमगीतच आहेत असे नाही, तर चंद्रासोबत काही अंगाई गीतेही आहेत. सगळय़ांची पहिली ओळख चंद्राबरोबर अंगाई गीतांतून झालेली आहे.

चंदा है तू मेरा सूरज है तू
तू मेरी आंखो का तारा है तू…

आईसुद्धा आपल्या बाळाबद्दल कौतुक सांगताना चंद्र-ताऱयांची मदत घेते. चंद्र इतका आपल्या संस्कृतीमध्ये सौंदर्याचं रूपक म्हणून समाविष्ट झाला आहे. चंद्रासोबत बालगीतं आहेत, तत्त्वज्ञानाची गाणी आहेत तशीच कव्वालीमध्येही चंद्र आहे. या सर्व गीतकारांमध्ये हसरत जयपुरी थोडे चतुर गीतकार आहेत. कारण त्यांनी त्यांच्या गीतात चंद्र वेगळय़ा पद्धतीने आणला. नायक नायिकेला प्रेमपत्र लिहिताना तिच्या सौंदर्याची तारीफ अशी करतो.

तुझे मैं चांद कहता था मगर उसमे भी दाग है
तुझे सूरज मे कहता था मगर उसमे भी आग है
मगर इतना ही कहता हुं की मुझको तुमसे प्यार है
ये मेरा प्रेम पत्र पढकर के तुम नाराज ना होना…

विज्ञान आणि भूगोल माहीत असणारा हा एकमेव कवी या प्रवासात भेटला, तर असा हा चंद्र आणि चांदण्यांसोबतचा सुंदर, रमणीय, शीतल प्रवास न संपणारा आहे, पण थांबायला तर हवं ना…

(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)