सिटी मॉलची आग- सखोल चौकशी अहवाल सादर करा, स्थायी समिती अध्यक्षांचे निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत पुठेही आगीच्या घटना घडल्यानंतर मुंबई अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणतात. मात्र, मुंबई सेंट्रल येथी सिटी सेंट्रल मॉलला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला 56 तास का लागले? त्यांना या आगीवर वेळीच नियंत्रण मिळवणे का शक्य झाले नाही, याबाबतचा सखोल चौकशी अहवाल अग्निशमन दलाने स्थायी समितीसमोर सादर करावा, असे आदेश स्थायी समिती अध्यक्षांनी दिले.

मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंट्रल मॉलला लागलेली आग अपेक्षित वेळेत विझवण्यात अग्निशमन दलप्रमुखांना अपयश आले आहे. या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी आज स्थायी समितीत हरकतीचा मुद्दा उपस्थित करून केली.

यावेळी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी अग्निशमन दलाला चांगलेच धारेवर धरले. ते म्हणाले, ‘मुंबईत ही आगीची पहिलीच घटना नाही. मात्र, सिटी मॉलमधील आग आटोक्यात आणताना अग्निशमन दलाला अपेक्षित वेळेत यश आले नाही. मात्र, अग्निशमन दलाने काही तासांनी ही आग नियंत्रणात आणली. मात्र, पुन्हा या आगीने भीषण रूप धारण केले. मुंबईकरांसाठी ही चिंतेची बाब आहे.

या मॉलमध्ये नेमके काय बदल करण्यात आले, या मॉलमध्ये अग्निशमन यंत्रणा होती की, नाही? या सर्व बाबी समोर येणे आवश्यक आहे. म्हणून याबाबतचा अहवाल आगामी स्थायी समितीच्या बैठकीत सादर करा,’ असे आदेश यशवंत जाधव यांनी दिले. त्याचबरोबर वरळीच्या ऑट्रिया मॉलमध्येही मोठया प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. तिथेही सिटी मॉलसारखी संभाव्य दुर्घटना होण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी या मॉलचीही चौकशी केली जावी, असे आदेश यशवंत जाधव यांनी अग्निशमन दलाला दिले आहेत.

अनुपस्थित अग्निशमन दलप्रमुखांवर कारवाई करा!

स्थायी समितीची बैठक असताना संबंधित विभागाच्या खातेप्रमुखांनी उपस्थित राहणे बंधनकारक आहे. पालिका आयुक्तांनी याबाबत संबंधित अधिकाऱयांना निर्देश द्यावेत तसेच आजच्या बैठकीला अग्निशमन दलाचे प्रमुख उपस्थित नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश यशवंत जाधव यांनी संबंधित विभागाला दिले. तसेच पुढील बैठकीला विषयानुसार त्या-त्या विभागाच्या खातेप्रमुखांनी उपस्थित राहावे, असे आदेशही त्यांनी दिले.