नगरच्या हिंगणगावमध्ये ड्रोन फ्लाईटने सिटीसर्वेचे काम सुरू

645

राज्य सरकारने ग्राम विकास खात्यांतर्गत प्रत्येक गावात ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या गावठाण जमिनीचा,खाजगी मालकीच्या मिळकतींचा सिटी सर्वे करण्याचा निर्णय शासनाने शिर्डीतील सरपंच मेळाव्यात जाहीर केला. त्याची तातडीने अंमलबजावणी सुरू झाली आहे. सरपंच व ग्रामसेवक यांना गावांमध्ये काम करत असताना कामांमध्ये सुसंगती येण्यासाठी हा उपक्रम संपूर्ण राज्यभर राबवला जात आहे. ग्रामपंचायत हद्दीमध्ये येणाऱ्या मिळकतीवर गावांमध्ये शासनाच्या योजना राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी हा ग्रामीण भागाचा सिटीसर्वे उपयोगात येणार आहे.

अनेक गावांमध्ये सिटीसर्वे नसल्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार करत असताना स्थानीक पातळीवर अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्याचा परिणाम गावांच्या विकासावर होत आला आहे.  हा अनुभव गावच्या सरपंच व ग्रामसेवकांना वारंवार आला आहे. त्यानुसार हिंगणगाव येथे दोन दिवस प्रत्येक मालमत्ताधारक, धार्मिक स्थळे, शैक्षणिक संस्था, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, इतर सर्व संस्था यांच्या चुना टाकून हद्द निश्चित करण्यात आल्या. त्यानंतर ड्रोन फ्लाईटने संपूर्ण हिंगणगाव व हमीदपूर या गावचा सिटी सर्वे करण्यात आला. भविष्यात सिटीसर्वेमुळे संपूर्ण गावचा नकाशा तयार होईल,हद्द निश्चित होतील,अतिक्रमणे होणार नाहीत,रस्ते मोकळे होतील,मिळकतींची भांडणे बंद होतील असे सरपंच आबासाहेब पाटील सोनवणे यांनी सांगितले. ड्रोन सर्वे करतेवेळी लोकनियुक्त सरपंच आबासाहेब पाटील सोनवणे, नगरचे भुमी अभिलेख उपअधिक्षक गजानन पोळ,सर्वे ऑफ इंडियाचे अधिकारी अमित महाजन, प्रथमेश निलवर्ण, जयदीप गाडे, गणेश साबळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या