
मुंबई महानगरपालिकेत मिंधे सरकारची हुकूमशाही आणि हस्तक्षेप सुरू आहे. त्याचा पर्दाफाश आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व राज्याचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने मुंबईच्या विकासासाठी प्रभावी धोरणे अवलंबली होती. सध्याच्या खोके सरकारचा मात्र मुंबईकरांच्या पैशांवर डोळा आहे. कृषी आणि उद्योग क्षेत्राप्रमाणेच ते मुंबईचे खच्चीकरण करत आहे. महापालिकेत फक्त तीनच गोष्टी सुरू आहेत… टेंडर, ट्रान्सफर व टाईमपास. मुंबईच्या रस्त्यांसाठी काढलेली टेंडर्स रद्द होत आहेत. चांगल्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या जात आहेत. नेमपं चाललंय काय? नक्की हे सरकार कोण चालवतंय? कुणाच्या आदेशावरून हे सगळं होतंय, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला. मुंबईच्या समस्यांबद्दल चर्चा करण्याचे जाहीर आव्हानही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यावेळी दिले.
आदित्य ठाकरे यांचे आठ सणसणीत सवाल…
1 मुंबईतील पाच हजार कोटींच्या रस्त्यांच्या निविदांसाठी कुणीच पुढे आले नाही की, तुमचे कोणी पुढे आले नाही?
2 मुंबईत आम्ही हाती घेतलेली अनेक कामे खोके सरकारने थांबवली. हे मुंबईचे खच्चीकरण असून हे नेमकं कुणासाठी चाललंय? यामागील नेमका सूत्रधार कोण? याचे उत्तर देऊ शकाल?
3 मुंबई महापालिकेमध्ये महापौर नसताना एवढी उधळपट्टी कोणाच्या आदेशावरून होत आहे? ही कुणाची राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे.
4 मंदिरांच्या कामावर, किल्ल्यांच्या कामावर, स्मारकाच्या कामावर स्थगिती आली आहे. हे खोके सरकारचे हिंदुत्व आहे का?
5 मुंबई महानगरपालिकेचा निधी मिंधे गटाच्या वाढीसाठी वापरला जातोय का? याचे उत्तर आहे का तुमच्याकडे?
6 रस्त्यांसाठी काढलेली टेंडर्स रद्द होत आहेत. चांगल्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या जात आहेत. इतका गडबड गोंधळ कोणाच्या इशाऱ्यावरून चाललाय. नक्की हे सरकार कोण चालवतंय?
7 मुंबई महापालिकेचा कारभार गेली 25 वर्षे शिवसेना पारदर्शकपणे चालवत आहे. आता प्रशासक बसल्यावर व खोके सरकार आल्यावर ही पारदर्शकता का दिसत नाही?
8 मुंबई महापालिकेच्या 11 सीबीएसई आणि एका आयसीएसई शाळेसाठी लागणारी राज्य सरकारची एनओसी अजून का दिली नाही?



























































