
अवसायनात काढलेल्या सीकेपी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांना त्यांच्या पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ठेवीदारांच्या पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी मिळाव्यात म्हणून बँकेचे अवसायक व जिल्हा उपनिबंधकांनी ठेवदारांची केवायसी प्रक्रिया पूर्ण करून अवश्यक त्या कागदपत्रांसह डिपॉझिट इन्शुरन्स अॅण्ड व्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (डीआयसीजीसी) विमा मंजूर करण्याबाबतचे दावे दाखल केले होते, त्यास कॉर्पोरेशनने मंजूरी दिली असून सदर पाच लाख रुपयांपर्यंतची ठेवीदारांची रक्कम त्यांनी दिलेल्या खात्यामध्ये वळती केली जाणार आहे.
आर्थिक अडचणीत आल्याने रिझर्व्ह बँकेने सुरुवातीला सीकेपी बँकेच्या व्यवहारावर निर्बंध आणले होते. त्यानंतरही बँकेच्या अनुउत्पादक कर्जाचे प्रमाण वाढत गेल्याने रिझर्व्ह बँकेने बँकेचा बँकिंग परवाना रद्द करत अवसायकाची नेमणूक करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार सहकार आयुक्तांनी जिल्हा उपनिबंधक जे. डी. पाटील यांची अवसायक म्हणून नेमणूक केलेली आहे.
त्यांनी विम्याचे संरक्षण असलेल्या पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी परत मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार संबंधितांची केवायसी पूर्ण करून आवश्यक कागदपत्र जमा करून डीआयसीजीसीकडे विमा दावे सादर केले होते. त्यास डीआयसीजीसीने मंजुरी दिली असून ठेवीदाराने दिलेल्या दुसऱया बँकेच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्याबाबतचे पत्र संबंधित ठेवीदारांना पाठवले असल्याचे जे. डी. पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
ठेवीदारांनी केवायसी पूर्ण करावी
सीकेपी बँकेच्या ज्या ठेवीदारांनी अद्याप केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही तसेच आवश्यक कागदपत्रे आणि माहिती बँकेला दिलेली नाही त्यांनी तत्काळ आपले सीकेपी बँकेच्या ज्या शाखेत खाते आहे तेथे जाऊन सर्व प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन जे. डी. पाटील यांनी केले आहे.


























































