कांदिवलीत भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, पालकमंत्र्यांसमोर जुंपली

महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मुंबई भाजपमधील पक्षांतर्गत गटबाजी चव्हाटय़ावर आली आहे. मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आशीष शेलार यांच्यासमोरच भाजपच्या दोन गटात फ्रीस्टाईल हाणामारी झाली. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

भाजप मुंबई अध्यक्ष आशीष शेलार पालकमंत्री रहिवाशांच्या भेटीला या कार्यक्रमासाठी कांदिवली पूर्व जानुपाडा वस्तीत आले होते. यावेळी भाजपच्या दोन गटांत वाद झाला. आशीष शेलार यांच्या समोरच कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. कार्यकर्त्यांमधील तुंबळ हाणामारीचे हे प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत पोहचले आहे. दरम्यान, या घटनेतील  भाजप पदाधिकाऱ्याने हा आमचा पक्षाचा अंतर्गत वाद आहे. पक्षाने त्याची दखल घेतली आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही करू असे म्हटले आहे. दरम्यान भाजपच्या स्थानिक नेत्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत देवांग दवे यांची मनधरणी करत तक्रार न करण्याची विनंती केली.