सावंतवाडी नजीकच्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा दोन गटात राडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सावंतवाडी नजीकच्या एका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादातून आदित्य राठोड या विद्यार्थ्याला काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मारहाण करून मोती तलावात ढकलून दिले. मात्र अक्षय वेसणकर व अमेय बेलवडेकर या जागरूक युवकांनी या विद्यार्थ्याला तळ्यातून बाहेर काढल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. या प्रकरणी आदित्य विनोद राठोड (22, सध्या रा. सावंतवाडी, मूळ रा. मांडवा समेत डोंगर, जि. बुलढाणा ) याने सावंतवाडी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून स्वप्निल जाधव, ओमप्रसाद जाधव व स्वप्नील हातागळे ( तिघेही राहणार सावंतवाडी) या तिंघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्याच्या गटात किरकोळ वादातून मंगळवारी सकाळी बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे पर्यावसान रात्रीच्या वेळी सावंतवाडी मध्ये हाणामारीत झाले.त्यानंतर रात्री 9.30 च्या सुमारास आदित्य राठोड त्याचे मित्र ओमकार पाटील व विश्वतेज गोरड यांच्या समवेत येथील राजवाडा गेट समोर मोती तलावाच्या काठावर बसून गप्पा करीत होते. याच दरम्यान स्वप्नील जाधव, ओमप्रसाद जाधव व स्वप्नील हातागळे यांच्यासह अन्य 5 युवक त्या ठिकाणी आले. त्यांची ओमकार पाटील समवेत शाब्दिक बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे पूनर्वसन हाणामारीत झाले. त्यावेळी शहरातील काहि स्थानिक युवकांना एका गटाने बोलवून घेत आदित्य राठोड विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली आणि त्याला मोती तलावात ढकलून दिले.