किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण हटविण्यास प्रारंभ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूर, दि. 8 (प्रतिनिधी) – ऐतिहासिक किल्ले विशाळगडावरील अतिक्रमणे काढण्यासंदर्भात बुधवारी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी तातडीने अतिक्रमण हटविण्याबाबत श्रीमंत संभाजीराजे छत्रपती यांना आश्वासन दिले होते. त्यानंतर आज दुसऱयाच दिवशी जिल्हा प्रशासनाने मोहीम राबवत गडाच्या पायथ्याची आणि जुन्या फरसबंदी मार्गावरील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली आहे.

विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात अनेक वर्षांपासून प्रयत्न करणाऱया शिवभक्तांच्या प्रयत्नांना यश आले असून, लवकरच विशाळगड अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त होईल, अशी आशा आहे.

विशाळगडाची अवस्था अतिक्रमणामुळे भयानक झाली आहे. यावर वारंवार शिवप्रेमी तसेच हिंदुत्ववादी संघटनांकडून आक्षेप घेण्यात येत होता. त्यामुळे या गडावरील अतिक्रमणे करण्यासंदर्भात पुरातत्व खाते आणि जिल्हा प्रशासनाकडून हालचाली सुरू होत्या. पण, याबाबत ठोस कारवाई होत नसल्याने, अखेर संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगडाला भेट देऊन गडाच्या दयनीय अवस्थेवरून सरकारला खडे बोल सुनावले होते. या पार्श्वभूमीवर बुधवारी  छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात विशाळगडावरील ‘अतिक्रमण हटाव’बाबत बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्य वनअधिकारी उपस्थित होते.

 संभाजीराजे म्हणाले, ‘‘स्वराज्यात महत्त्वाचा असलेला विशाळगड हा किल्ला एक शक्ती केंद्र आहे. मात्र, आज या गडाची अतिक्रमण आणि घाणीमुळे महाभयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. येथे हिंदू-मुस्लिम असा जातीयतेचा प्रश्न नसून, अतिक्रमणाचा आहे. येथे होणाऱया अवैध धंदे, दारूपाटर्य़ांसह गचाळपणा कमी करण्याच्या दृष्टिकोनातून बैठक झाली. यामध्ये महाशिवरात्रीच्या आत अतिक्रमण काढण्याला सुरुवात करू, असा शब्द जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिला होता. त्यानुसार आज अतिक्रमण हटविण्यास प्रारंभ झाला आहे.