जिल्हा रुग्णालयातील स्वच्छता कामगारांचा पालकमंत्र्यांच्या घरापुढे ठिय्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । चंद्रपूर

तीन दिवसांपासून थकीत वेतनाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या जिल्हा रुग्णालयातील स्वच्छता कामगारांनी बुधवारी थेट पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या घरापुढे ठिय्या दिला. अनपेक्षितपणे केलेल्या या आंदोलनाने पोलीस प्रशासनाची चांगलीच भंबेरी उडाली. जिल्हा रुग्णालयातील स्वच्छता कामगारांचे वेतन मागील चार महिन्यांपासून थकीत आहे. शिवाय किमान वेतन कायद्यानुसार वेतन द्यावे, या मागणीसाठी सुमारे तीनशेपेक्षा जास्त स्वच्छता कामगार जटपुरा गेटजवळ मागील तीन दिवसांपासून उपोषणावर बसले आहेत.

आपल्या न्याय मागण्यांसाठी उपोषण करणाऱ्या या कामगारांना पोलीस सुरक्षा तर सोडा, त्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरसुद्धा पाठवले जात नाहीत. त्यामुळे बुधवारी जनविकास अंसघटीत कामगार संघटनेचे प्रमुख पप्पू देशमुख यांनी या कामगारांना घेऊन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नवीन घरापुढे ठिय्या आंदोलन केले. तेव्हा अवघ्या पाच मिनिटांत पोलीस तेथे दाखल झाले आणि त्यांनी कामगारांना हटवले. पोलीस किंवा जिल्हा प्रशासनाला कामगारांची काळजी नाही, तर पालकमंत्र्याची काळजी वाटते, हे दाखवून देण्यासाठी हे आंदोलन करावे लागल्याचे आंदोलकांनी सांगितले.