
गेल्या दोन दिवसांपासून उकाडय़ाने हैराण झालेल्या मुंबईकरांची शनिवारची दुपार मात्र अंधारात गेली. ऐन दुपारी सर्वत्र अंधार पसरल्याने दुपारी तीन वाजताच दिवे लावण्याची वेळ मुंबईकरांवर आली. अनेक ठिकाणी ढगांचा कडकडाट सुरू झाल्याने अनेकांनी पावसाची धास्ती घेतली. मुंबईत अनेक ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला. दरम्यान, दुपारनंतर अनेक ठिकाणी धुक्याची चादर पसरल्याचे चित्र मुंबईकरांना पहायला मिळाले.
मान्सूनने राजस्थानधून परतीच्या प्रवासात उशीर केल्यामुळे मुंबईत 14 ऑक्टोबरपर्यंत पाऊससदृश्य परिस्थिती पहायला मिळणार आहे. त्याचाच प्रत्यय मुंबईकरांना पहायला मिळाला. दुपारी दोन वाजेपर्यंत मुंबईत कडाक्याचे उन होते. मात्र अचानक अंधार पसरायला लागला. हा अंधार इतका होता की, मुंबईत जोरदार पावसाचे आगमन होणार अशी भिती मुंबईकरांना वाटू लागली. काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली. रात्री सातनंतर वातावरण बऱ्यापैकी निवळले. सक्रीय हवामानाच्या परिस्थितीमुळेच हे बदल पहायला मिळाले.
मुंबईकर उकाडय़ाने हैराण
मुंबईत एकीकडे हवामानाच्या अनेक घडामोडी पहायला मिळत असताना मुंबईकर मात्र उकाडय़ाने हैराण झाला आहे. परतीच्या पावसाचा प्रवास लांबल्याने हवामानात बदल होत असल्याचे हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तर दुसरीकडे मुंबईत आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने मुंबईकरांना घामटा फुटला आहे. मुंबईत शनिवारी सकाळी कुलाबा वेधशाळेत 89 टक्के तर सांताक्रुझ वेधशाळेत 81 टक्के आर्द्रता नोंदविण्यात आली आहे.




























































