धावत्या खासगी बसने अचानक घेतला पेठ, चालकाच्या तत्परतेने टळला मोठा अनर्थ

तुळजापूर शहरापासून काही अंतरावर नागोबा मंदिर परिसरात शनिवारी (दि.११ ऑक्टोबर) दुपारी २:३० वाजताच्या सुमारास नांदेड येथील शर्मा ट्राव्हल लातूर तुळजापूर वरून सोलापूर कडे जाताना ब्रेक लायनर जाम झाल्याने ट्राव्हलसने भिषण पेट घेतला घेतल्याची धक्कादायक घटना घडली. तुळजापूरहून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या शर्मा ट्रॅव्हल्स (एमएच-२६ सीएच-१८३०) या प्रवासी बसला अचानक आग लागली. सुदैवाने चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, देवराज हॉटेलसमोर जात असताना बसच्या ब्रेक लाइनरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने इंजिन व टायरमधून अचानक धूर निघू लागला. चालक परमेश्वर शहाजी केंद्रे (रा. वागदरवाडी, ता. लोहा, जि. नांदेड) यांनी क्षणाचाही विलंब न लावता गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि कंडक्टरला सुरक्षित बाहेर काढले.

दरम्यान, बसमधून येणाऱ्या फटफट आवाजामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

घटनेची माहिती मिळताच तुळजापूर नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाची गाडी व तामलवाडी टोलनाक्याची ॲम्बुलन्स (१०३४) तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. आग विझवण्यासाठी प्रयत्न युद्धपातळीवर करून आग विझवली .

या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी बसचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ब्रेक लाइनर जाम झाल्याने टायर घासून गरम झाले आणि त्यातूनच आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

घटनास्थळी तुळजापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, तसेच तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तात्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असून पुढील तपास सुरू आहे.