
शिवणी कोतल परिसरात आज सायंकाळी पाच वाजल्यापासून तब्बल एक तास पाऊस पडत होता. येथील शेतकऱ्यांनी तीन ते चार वेळा पेरणी करूनदेखील सोयाबीन इतर पिकांचे पीक योग्य प्रकारे उगवले नव्हते. शिवाय उगवलेल्या पिकाचे गोगलगाय आणि हरिणांनी नुकसान केले होते, मात्र आज झालेल्या ढगफुटीमुळे शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
शेतीचे पीक घेण्यासाठी केलेला खर्च कसा भरून काढायचा, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर ‘आ’ वासून उभा आहे. त्यात सतत कोरडा आणि ओला दुष्काळ पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही. येथील गहिनीनाथ शेळके या तरुण शेतकऱ्याने बोअरवेलच्या पाण्याचा उपयोग करून सोयाबीन बियाण्याची पेरणी केली होती, पण या पिकाची प्राण्यांनी नासधूस केली होती, त्यामुळे थोडेसेच पीक शिल्लक राहिले होते, मात्र आज झालेल्या ढगफुटीमुळे संपूर्ण सोयाबीन पीक पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे यावर्षी झालेला खर्च निघेल की नाही ही चिंता या शेतकऱ्याला सतावत आहे. ढगफुटीमुळे होणाऱ्या पिकाच्या नुकसानीतून सावरण्यासाठी कमीत कमी हेक्टरी पन्नास हजारांची तरी मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे तसेच पेरणाची खर्च कसा भागवावा, घर खर्च कसा चालवावा हे प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे आहेत. यामुळे शासन कोणती भूमिका घेते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.