
इंधन तुटवडय़ाच्या भीतीने राज्यातील पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा लागून दुर्घटना घडू लागल्या आहेत. त्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जनतेला, इंधन तुटवड्याची अफवा असून घाबरून जाऊ नका असे आवाहन केले आहे. जगातील परिस्थिती कितीही बिघडली असली तरी देशाने आपली पुरवठा साखळी चांगली ठेवली आहे, लोकांनी पॅनिक होऊन पेट्रोल-डिझेल खरेदी केले तर ती पुरवठा साखळी बिघडू शकते असे फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना इंधन तुटवड्या बद्दल वस्तुस्थिती स्पष्ट केली. ते म्हणाले की, ‘पेट्रोल आणि डिझेलचा आपल्याकडे पुरेसा साठा असल्याचे केंद्र सरकारकडून वारंवार सांगितले जात आहे. त्यानंतरही लोकांमध्ये भीती निर्माण होत आहे. पेट्रोल पंपांवर दर दिवशी, महिन्याला आणि वर्षाला किती पेट्रोल-डिझेल लागते त्या आधारावर पुरवठा साखळी बनवली गेली आहे. लोकांनी घाबरून जाऊन प्रमाणापेक्षा जास्त इंधन खरेदी केले तर त्याचा पुरवठा साखळीवर परिणाम होऊ शकतो. लोकांनी एकाच दिवशी बँकेतून पैसे काढायला सुरुवात केली तर बँक पैसे देऊ शकणार नाही; कारण ते पैसे गुंतवलेले असतात. तशीच ही परिस्थिती आहे.’


























































