मुलभूत सुविधांसाठी मुंबईकर दयनीय, भाजप-मिंधे सरकारची डोळेझाक; आदित्य ठाकरेंचा घणाघात

मुंबई, नवी मुंबईतील अनेक प्रकल्प पूर्ण झालेले असतानाही मुख्यमंत्र्यांना उद्घाटनासाठी वेळ नसल्याने या प्रकल्पांचे वेळेवर लोकार्पण होत नाहीय. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागतोय. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरेंनी वेळोवेळी याचा भांडाफोड केलेला आहे. आताही मुंबईतील देशांतर्गत विमानतळ जंक्शनवरील एक उड्डाणपूल पूर्णपणे तयार असूनही घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्याने त्याचे उद्घाटन होत नसल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

आदित्य ठाकरे यांनी एक्स (ट्विटर) अकाउंटवर यासंदर्भात पोस्ट केली आहे. ‘मुंबईतील देशांतर्गत विमानतळ जंक्शनवरील हा उड्डाणपूल आठवडाभरापासून पूर्णपणे तयार असूनही केवळ घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना लोकांसाठी वेळ नसल्याने त्याचे उद्घाटन होत नाहीये. दररोज रात्री इथल्या खांबांवरचे दिवे सुरू असतात आणि मुंबईकर मात्र तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकलेले असतात. साध्या साध्या मूलभूत सुविधांसाठी मुंबईकर दयनीय झाले असताना, मुंबईकरांच्या ह्या त्रासाकडे भाजप प्रणित मिंधे राजवट सरळ डोळेझाक करताना दिसते, तेव्हा प्रचंड संताप येतो’, असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

ते पुढे म्हणतात, मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना आव्हान देतोय की, त्यांनी त्यांचा अहंकार बाजूला ठेवावा आणि एमएमआरडीएला आजच हा उड्डाणपूल जनतेसाठी खुला करण्याची सूचना द्यावी. ते आपला अहंकार बाजूला ठेवू शकतात का ते पाहूया.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

दुसरीकडे गोखले पुलाबद्दल बीएमसीचे भ्रष्ट प्रशासक म्हणतात, पूल तयार आहे पण लोड चाचणीच्या प्रतीक्षेत आहे, तर स्थानिक भाजप आमदार म्हणतात, की ‘मॅस्टिक वर्क’ आणि इतर वरवरची कामं बाकी आहेत. लोकांची हेतुपुरस्सर दिशाभूल करु पाहणाऱ्या ह्या भाजप आमदाराला मला अवघडलेल्या परिस्थितीत टाकायचे नाहीये. पण महानगरपालिकेचे आयुक्त (ज्यांची बदली जवळ आली आहे आणि जे उच्च पदासाठी प्रयत्न करत आहेत) मात्र फक्त घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना अर्ध्या पुलाचं उद्घाटन करायला वेळ मिळेल ह्याची खातरजमा करण्यासाठी वेळ काढत आहेत. किती लाजिरवाणं आहे हे सगळं! असेही आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

लहान पक्षांना संपवायचे, मोठ्यांना फोडायचे ही बावनकुळेछाप भाजप नेत्यांची भूमिका महाराष्ट्र व देशाला घातक! 

मी मीडिया, पत्रकार आणि मुंबईकरांना दोन्ही पुलांना भेट देण्याचं आमंत्रण देतोय, त्यांनी स्वतः येऊन प्रत्यक्ष पहावं की कशाप्रकारे ही भाजप प्रणित मिंधे राजवट मुंबईची वाट लावत आहे आणि मुंबईकरांना सतत त्रासात ढकलत आहे. प्रश्न असा आहे की, इतकं झाल्यावरही घटनाबाह्य मुख्यमंत्री आपला अहंकार बाजूला ठेवून लोकांसाठी हे पूल खुले करणार का? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.