
सामना ऑनलाईन । नागपूर
नक्षलवाद्यांच्या भूसुरुंग स्फोटात शहीद झालेल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही असे स्पष्ट प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली येथे केले. या दुर्दैवी घटनेची राज्याच्या पोलीस महासंचालकांमार्फत संपूर्ण चौकशी केली जाईल अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
गडचिरोली जिह्याच्या कुरखेडा तालुक्यातील जांभूरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटातील शीघ्र कृती दलातील 15 शहीद झालेल्या पोलीस जवानांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. तसेच शहीदांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही असे शहीदांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करताना सांगितले.
पोलीस कवायत मैदानावर गडचिरोली पोलीस दलातर्फे शहीद पोलीस जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सशस्त्र पोलीस दलातर्फे बंदुकीच्या हवेत 21फैरी झाडून सलामी देण्यात आली. पोलीस दलातर्फे संपूर्ण शासकीय प्रथेनुसार सर्व शहीद पोलीस जवानांना भावपूर्ण मानवंदना दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेत मृत पावलेल्या 15 शहीद पोलिसांच्या पार्थिवांवर पुष्पचक्र अर्पण केले व आपली भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री राजे अंबरीशराव आत्राम, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनीही शहीदांना पुष्पचक्र श्रद्धांजली अर्पण केली.
शहीदांना एक कोटी आठ हजार रुपये एकत्रित मदत
नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरूंग स्फोटात शहीद झालेल्या पोलीस शिपायांच्या कुटुंबीयांना शासनातर्फे संपूर्ण मदत देण्यात येणार आहे. यामध्ये एक कोटी आठ हजार रुपये एकत्रित मदत, शहीदांच्या वारसांना त्यांच्या पुढील चरितार्थासाठी शहीद पोलिसांच्या पुढील शासकीय सेवेनुसार 58 वर्षांपर्यंत पूर्ण पगार तसेच अवलंबून असलेल्या कुटुंबातील एका व्यक्तीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी, शहीदांच्या मुलांचा पदवीपर्यंत शिक्षणाचा संपूर्ण खर्च करण्याची जबाबदारी पोलीस विभाग स्वीकारणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी शहीदांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करताना दिली.






























































