
राजस्थानमध्ये कॉँग्रेस आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या सत्तासंघर्षाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकत राज्यातील कॉँग्रेस सरकार भक्कम असल्याचे दाखवून दिले आहे. सचिन पायलट पुन्हा माघारी परतल्याने कॉँग्रेसचे सरकार पाडण्याचा भाजपचा प्रयत्न पुरता फसला आहे.
शुक्रवारपासून सुरू झालेल्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात संसदीय कार्यमंत्री शांती धारीवाल यांनी सरकारकडूनच विश्वासदर्शक ठराव मांडला. मुख्यमंत्री गेहलोत यांच्या नेतृत्वातील कॉँग्रेस सरकारने आवाजी मतदानाने हा ठराव जिंकत भाजपला जोरदार धक्का दिला. दरम्यान विधानसभा अधिवेशन 21 ऑगस्टपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.
भाजप म्हणजे ‘सौ चुहे खाकर बिल्ली चली हज : गेहलोत
सरकार पाडण्याची परंपरा राजस्थानात नाही, परंतु भाजपने नंगानाच सुरू केला आहे. अनेक राज्यांमधील लोकनियुक्त सरकारे षड्यंत्राने पाडली जात आहेत. भाजपचे वर्तन म्हणजे ‘सौ चुहे खाकर बिल्ली चली हज’ आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपवर हल्लाबोल केला.






















































