
कोरोनाचे संकट रोखण्यासाठी लसीकरण मोहिमेला वेग देणे गरजेचे आहे. मात्र, लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरणात अडचणी येत आहेत. लस पुवठ्याच्या मुद्द्यावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रावर हल्ला चढवला आहे. दिल्लीत बुधवारी ड्राइव्ह थ्रू व्हॅक्सीन मोहिमची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत केजरीवाल यांनी केंद्रावर हल्ला चढवला.
मार्च महिन्यात वेगाने लसीकरण झाले असते तर कोरोनाची दुसरी लाट आलीच नसती, असे ते म्हणाले. मात्र, देशभरात लसींची तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे लसीकरणात अडचणी येत आहेत. केंद्राचे काम आहे, ते राज्य कशी करणार असा सवालही त्यांनी केला. या गंभीर मुद्द्याचे राजकारण न करता या संकटाशी मुकाबला करण्यासाठी टिम इंडियाप्रमाणे एकत्र येत काम करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
कोरोना लस पुरवठ्याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला. केंद्राने राज्यांना आपापल्या लसींची व्यवस्था करा, असे सांगितले आहे. लस पुरवठ्याबाबत आपण अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहोत. कोणत्याही राज्याला अद्याप लसींचा पुरवठा झालेला नाही. लस कंपन्यांनी केंद्रीशी चर्चा करत असल्याचे सांगितले आहे. कंपन्यांचे टेंडरच मंजूर होत नसतील तर लस पुरवठा कसा होणार असा सवालही त्यांनी केला.
युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर त्यावेळीही केंद्र सरकार राज्यांना आपापली सुरक्षा स्वतः करा असे सांगणार का, समजा पाकिस्तानने हल्ला केला तर केंद्र पराभूत झाले म्हणजे देश पराभूत झाला. हे समजून घेत कोरोनाच्या संकटातही एकत्र येत काम करण्याची गरज आहे. सर्व राज्यांचे मुख्यमंत्री देशाचे सैनिक या नात्याने कोरोनाशी मुकाबला करत आहेत. अशा वेळी केंद्राने आपली जबाबदारी पार पाडावी. केंद्राचे काम राज्य कसे करणार, असा सवालही त्यांनी केला आहे. केंद्र सरकारने लस पुरवठ्याबाबत पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले.




























































