
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना संसर्गाची ही साखळी जोपर्यंत तोडली जात नाही तोपर्यंत रुग्णवाढ रोखणे अशक्य आहे. हे लक्षात घेता कोरोनाची ‘भीती’ वाटण्यापेक्षा तो कसा जाईल, हा संसर्ग कसा रोखायचा याची लोकांना ‘चिंता’ वाटली पाहिजे. यासाठी जनजागृती करणे आवश्यक असल्याचे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना व्यक्त केले.
कोरोनाविरोधातील ही लढाई तुमची माझी एकटय़ाची नाही तर आपली सर्वांची आहे. त्यासाठी काही प्रमाणात कठोर निर्बंध हे लावावेच लागतील असे
स्पष्ट करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज असल्याचे सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचनांचे पालन केले असते तर कदाचित आजची परिस्थिती ओढवली नसती, असे ते म्हणाले.
सरकारला लॉकडाऊन करण्यास आवडत नाही. ही लढाई एकटय़ा सरकारची नाही तर तुम्हा-आम्हा सर्वांची आहे. अशा वेळी सर्वांनी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांना साथ दिली पाहिजे. याचे राजकारण नको. कोरोनाशी लढताना भीतीचे वातावरण नको, तर एकमेकांची योग्य काळजी कशी घेऊ या दृष्टीने समाजात जागृती निर्माण झाली पाहिजे आणि त्या कामी माध्यमांनी सहकार्य करावे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
कोरोना लॉकडाऊन व अन्य उपाययोजनांसदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी झूम मीटिंगद्वारे संवाद साधला. आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम पुंटे, आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांच्यासह विजय दर्डा, गिरीश कुबेर, विनायक पात्रुडकर, जयश्री खाडिलकर, बाजीराव दांगट यावेळी उपस्थित होते. माध्यम प्रतिनिधींनी केलेल्या सूचनांची योग्य ती अंमलबजावणी कोरोनासंदर्भातील उपाययोजना करताना केली जाईल, असे मुख्य सचिव कुंटे यांनी सांगितले.
कोरोना संसर्गाची राज्यातील गेल्या वर्षीची व आजची स्थिती यातील फरक हा खरोखरच गंभीर आहे. यातून आताच सावरले नाही तर परिस्थिती भयानक होईल. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये असे वाटत असेल तर कोरोना संकटाचा एकजुटीने मुकाबला करण्याची आवश्यकता आहे.
कोरोना महामारीच्या संकटात रोजगाराच्या सुरक्षेपेक्षा लोकांचा जीव अधिक महत्त्वाचा आहे.
लोकांनी स्वतःहून गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
स्थानिक पातळीवर दुकानदार, विव्रेता यांची कोरोना चाचणी करूनच त्यांना परवानगी द्यावी.
राज्याच्या हिताच्या निर्णयाला व्यायामशाळा चालकांनी सहकार्य करावे
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन आता पुन्हा आपल्याला कोरोनावर लक्ष केंद्रित करावे लागेल. ‘जान है तो जहान है…’ या उक्तीनुसार जीव राहिला तर पुढे आपण व्यायाम करू शकणार आहे. त्यामुळे यापुढे राज्याच्या हिताचा म्हणून जो निर्णय घ्यावा लागेल त्यामध्ये व्यायामशाळा-जिम चालकांनी सर्व शक्तिनिशी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. आपली सर्व यंत्रणा कोरोनावर काम करते आहे. रुग्ण शोधणे, त्यांचे ट्रॅपिंग, ट्रेसिंग आणि टेस्टिंगसाठी आरोग्य, पोलीस, महसूल यंत्रणा अथकपणे प्रयत्न करताहेत. यापूर्वीही निर्बंध आपण हळूहळू लावले होते आणि पुन्हा हळूहळू शिथिल केले होते. तशीच वेळ आली तर महाराष्ट्राच्या हिताचा मार्ग स्वीकारायला हवा. जो निर्णय घेऊ सगळ्यांच्या हिताचा असाच असेल. त्यामध्ये सर्वांनी सर्व शक्तिनिशी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
कामाच्या वेळांची विभागणी
कामाच्या वेळा विभागून घेतल्या तर रेल्वे, बेस्ट यासारख्या सार्वजनिक वाहतुकीवरील ताण कमी होईल तसेच कोरोना संसर्गाची चेन तोडण्यास मदत होईल. लोकल प्रवासामुळे कोरोना संसर्ग वाढतो असे नाही. लग्न समारंभ व अन्य ज्या ठिकाणी संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी आवश्यक ते निर्बंध घालण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
प्रवासी ट्रेन बंद करणार नाही
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने अचानक लॉकडाऊन घोषित केला. यामुळे रोजंदारीवर काम करणाऱया अन्य राज्यांतील स्थलांतरित मजुरांचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. राज्यातून बाहेर जाण्याची वेळ परत कुणावरही येऊ नये अशी आमची इच्छा आहे. कोरोनासंदर्भात कठोर निर्बंध लागू करताना प्रवासी ट्रेन पूर्णपणे बंद केल्या जाणार नाहीत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
नाटय़, चित्रपट क्षेत्राने कोरोना रोखण्यासाठी जनजागृती करावी
हे बंद करा, ते बंद करा ही आपली भूमिका नाही. पण येणाऱया बिकट परिस्थितीवर वेळीच मात करण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करावे लागतील. त्यामुळे आता जिंदगी, जान, उसके बाद काम या पद्धतीने जावे लागेल, असे सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी नाटय़निर्माता, आणि मल्टिप्लेक्स, चित्रपटगृहचालक संघटनेच्या प्रतिनिधींशी संवाद साधून कोरोना संक्रमण रोखण्यासाठी जनजागृती करण्यास पुढे यावे, असे आवाहन केले.
दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या या संवादात सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर, अभिनेते सुबोध भावे, उमेश कामत, नाटय़ परिषदेचे प्रसाद कांबळी, ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासह मराठी नाटय़ आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवर तसेच चित्रपटगृह चालक-मालक संघटनांच्या वतीने निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी, कमल गियानचंदानी, अजय बिजली, नितीन दातार, देवांग संपत, कुणाल स्वाहनी, प्रकास चाफळकर, कपिल अग्रवाल, सिद्धार्थ जैन, अलोक टंडन, राजेश मिश्रा आदी सहभागी झाले होते.
कोविड अपडेट शनिवारची रुग्णसंख्या
राज्य
रुग्ण – 49447
मृत्यू – 277
मुंबई
रुग्ण – 9108
मृत्यू – 27
ठाणे – 1482
नाशिक – 2459
पुणे – 5778
संभाजीनगर – 704
नागपूर – 2853
नगर -1464
नांदेड – 714
नवी मुंबई – 1327
डोंबिवली – 1278
पनवेल – 566
जळगाव – 832
नंदुरबार – 820






























































