गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात सुरू असलेल्या विविध  विकासकामांच्या आढाव्याची सुरुवात आपण विदर्भापासून केली असून गोसीखुर्द हा महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय प्रकल्प येत्या तीन वर्षांत पूर्ण करण्यात येईल. त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली.

पूर्व विदर्भासाठी वरदान ठरणाऱ्या वैनगंगा नदीवरील गोसीखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भेट  दिली. भंडारा जिल्हय़ातील पवनी तालुक्यातील गोसीखुर्द प्रकल्प स्थळाच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर आयोजित बैठकीत ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात सुरू असलेल्या विकासकामांच्या आढाव्याची सुरुवात मी विदर्भातील समृद्धी महामार्गापासून केली आहे. हे सारे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधीची गरज असली तरी राज्याची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन त्याचे नियोजन केले जाईल. अडचणींवर मात करून कामे पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कारण प्रकल्पांची कामे लांबल्यास त्याचा भार राज्याच्या तिजोरीवर पडतो. हा प्रकल्प सर्व घटकांच्या सहकार्याने नियोजीत वेळेत पूर्ण केला जाईल. तो पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्ष कामाचे नियोजन व येणाऱ्या खर्चासंदर्भात प्रत्यक्ष आराखडा तयार करा, त्यानुसार निधी उपलब्ध करून देण्याला प्राधान्य देण्यात येईल. पर्यटन विकासाचाही या अनुषंगाने विचार करण्यात यावा. प्रकल्प पूर्ण करताना पर्यावरणाचा समतोल राखला गेला पाहिजे, हा आमचा आग्रह आहे. या जलाशयात प्रदूषण दर्शविणाऱ्या घटकांचे अवशेष आढळून आले. प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. नाग नदीमुळे येथील पाण्याचे प्रदूषण होणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक आहे, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

  • गोसीखुर्द प्रकल्प हा पूर्व विदर्भातील अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. 18 हजार 495 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे नागपूर, भंडारा व चंद्रपूर जिह्यांना सिंचनासाठी मोठा लाभ होणार आहे.
  • या प्रकल्पाची एपूण सिंचन क्षमता 2 लाख 50 हजार 800 हेक्टर एवढी आहे. या प्रकल्पात एकूण जलसाठा 1146 दशलक्ष घनमीटर एवढा राहणार आहे. त्यापैकी 740 द.ल.घ.मी. उपयुक्त जलसाठा आहे.
  • धरणाचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. कालवे व वितरिकाच्या या माध्यमातून प्रवाही सिंचन 63 टक्के पूर्ण झाले आहे, तर उपसा सिंचनाद्वारे 37 टक्के सिंचन झाले आहे.
  • या प्रकल्पातून जास्तीत जास्त क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळावा तसेच पाण्याचा अपव्यय टाळावा यासाठी बंद नलिका वितरण प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. या प्रणाली अंतर्गत 1 लाख 22 हजार 177 हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

पवनी जलाशयात केले पक्षीनिरीक्षण

आपल्यातील संवेदनशील पर्यावरणप्रेमी व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून देताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अत्यंत व्यस्त आणि धकाधकीच्या अशा दौऱ्यातही निसर्गातील घटकांची माहिती घेतली तसेच त्यांच्या संवर्धनाविषयी जाणिवेने उपाययोजना करण्याची ग्वाहीही दिली. मुख्यमंत्र्यांनी पवनी तालुक्यातील प्रकल्प स्थळाला भेट दिली. वन परिक्षेत्र अधिकारी आणि पक्षी निरीक्षक पांडुरंग पाखले यांनी मुख्यमंत्र्यांना जलाशय परिसरातील पक्षांच्या विविध प्रजातींची माहिती दिली. येथे येणाऱ्या वैशिष्टय़पूर्ण पक्ष्यांची माहिती जाणून घेण्यास मुख्यमंत्र्यांनी विलक्षण आस्था दर्शविली. जलाशयात विहार करीत असलेल्या पक्ष्यांच्या सवयी, अधिवास, वैशिष्टय़े आदींबाबतही त्यांनी विविध बाबी अतिशय औत्सुक्याने जाणून घेतल्या. मुख्यमंत्र्यांनी येथे येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांचा भ्रमण मार्ग आणि त्यांचे मूळचे अधिवासी देश यासंदर्भात माहिती घेतली. स्थलांतरित पक्ष्यांमध्ये सायबेरिया, चीन, दक्षिण आफ्रिका यासह लडाख, हिमाचल आधी भागांतूनही मोठय़ा प्रमाणात पक्षी येतात.