लसीकरणाचा वेग वाढवा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लसीकरणामुळे कोरोनाच्या संसर्गाची तीव्रता कमी होते. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर लसीकरण करावे. ज्या जिल्ह्यांत कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस शिल्लक आहेत त्या जिह्यांत लसीकरणाचा वेग वाढवा असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड सद्यस्थितीच्या अहवालाचा आढावा घेतला. राज्यात 21 सप्टेंबर रोजी सुमारे 36 लाख कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस शिल्लक असल्याची माहिती सादर करण्यात आली. त्यावर आदेश देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्या जिल्ह्यांत कमी डोसेस दिले असतील त्यांनी लसीकरणाचा वेग मोठय़ा प्रमाणावर वाढवावा.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोविड सादरीकरण झाले. त्यात सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार कोविडचा संसर्ग उतरणीला लागल्याचे दिसून येते.

राज्यात एप्रिल महिन्यात दररोज कोविडचे सरासरी 59 हजार 647 रुग्ण सापडत होते. त्यानंतर मे महिन्यात 36 हजार 111, जूनमध्ये 10 हजार 543, जुलैमध्ये 7 हजार 738, ऑगस्टमध्ये 5 हजार 124 आणि 1 ते 21 सप्टेंबर या काळात राज्यात दररोज सरासरी 3 हजार 706 रुग्णांची नोंद झाली.
राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.20 टक्के आहे तर मृत्यूचे प्रमाण 2. 12 टक्क्यांवर आल्याचे कोविडच्या अहवालात नमूद केले आहे.

बेफिकीर राहू नका

लसीकरणामुळे संसर्ग होऊनदेखील रोगाची तीव्रता कमी असते शिवाय मृत्यूचे प्रमाण नगण्य आहे हे लक्षात घेऊन लसीकरण मोठय़ा प्रमाणावर पूर्ण करावे. रुग्ण संख्या कमी होत असली तरी आरोग्याचे नियम पाळण्यात बेफिकिरी नको, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.