
ऑक्सिजनचा तुटवडा, बेडचा तुटवडा या सर्वांतून कसरत करीत आपण दुसरी लाट थोपवली. लाट खाली आली आणि गर्दी पुन्हा होऊ लागली आहे. लाट ओसरली असली तरी अद्याप संपलेली नाही. दुसऱया लाटेचा विषाणू डेल्टा आहे. आता डेल्टा प्लस आढळलाय. त्याने अद्याप रंग दाखवले नसले तरी डेल्टा अजून राज्यात आहे. तिसरी लाट कधी येईल हे सांगता येत नाही, पण गर्दी पाहता दुसरीच लाट पुन्हा उलटेल, हा मोठा धोका आहे, असा इशाराच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिला.
एमएमआरडीएने मालाड येथे आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करीत उभारलेल्या कोविड रुग्णालयाचे हस्तांतरण मुंबई महानगरपालिकेला करण्यात आले त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, ‘दुसरीकडे लाट ओसरतेय, सगळीकडे बेड रिकामे आहेत. मग आपण हे आता का करतोय, असा प्रश्न अनेक जण विचारतील. त्या प्रश्न विचारणाऱयांना मी सांगेन की, बेडची कमतरता, ऑक्सिजनची कमतरता या सर्व परिस्थितीतून आपण दुसऱया लाटेचा सामना केला. ही लाट अद्याप संपलेली नाही.
गर्दी टाळली गेली नाही तर दुसरी लाट ओसरण्याऐवजी उलटेल. ही शक्यता गृहीत धरली तर आज जे मालाड कोरोना सेंटर आपण उभे करीत आहोत, त्याचे महत्त्व नागरिकांच्या लक्षात येईल.’
नागरिकांच्या आरोग्याचे हित जोपासताना उणीव भासू देणार नाही!
पुढच्यास ठेच, मागचा शहाणा या म्हणीप्रमाणे आपणास जगभर कोरोनाची लाट परत उसळत आहे ते पाहून सावध राहावे लागेल. पहिल्या लाटेच्या वेळेस आपण बीकेसी येथे देशातले पहिले फिल्ड रुग्णालय विक्रमी वेळेत उभारले. आपण आरोग्य सुविधांच्या उभारणीत आणि नागरिकांच्या आरोग्याचे हित जोपासताना कोणतीही उणीव भासू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिली.
सह्याद्री अतिथिगृह येथे झालेल्या या कार्यक्रमात नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक, परिवहनमंत्री अॅड. अनिल परब, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह चहल, महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास उपस्थित होते.
कांजूरमार्ग, शीव, वरळीत जम्बो कोविड सेंटर
मालाड जम्बोसह दुसऱया टप्प्यामध्ये कांजूरमार्ग, सायन, वरळी रेसकोर्स हे नवीन जम्बो सेंटरदेखील सुरू करण्यात येणार आहेत. तर नेस्को, रिचर्डसन अॅण्ड क्रूडास भायखळा आणि एनएससीआयमधील बेडची संख्या वाढवली जात आहे. जम्बो कोविड सेंटर्सच्या दुसऱया टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यापेक्षाही अधिक म्हणजे 8,320 इतके बेड उपलब्ध होत आहेत. यात 70 टक्के म्हणजे 5, 986 ऑक्सिजन बेड तर 1,140 आयसीयू बेड आहेत. लहान मुलांसाठी स्वतंत्र असे 600 ऑक्सिजन व 150 आयसीयू बेड आहेत. पहिला आणि दुसरा असे दोन्ही टप्पे मिळून जम्बो कोविड सेंटर्समधील एकूण बेडसंख्या आता 15 हजार 627 होते आहे. त्यात 9,193 ऑक्सिजन बेड, 1,572 आयसीयू बेड आहेत. यामध्ये लहान मुलांसाठी एकूण 1,200 ऑक्सिजन पेडियाट्रिक बेड आणि 150 पेडियाट्रिक आयसीयू बेड उपलब्ध असतील. मुंबईत सध्या जवळपास 20 हजारांवर कोविड बेड उपलब्ध आहेत. म्हणजेच बाधितांवर उपचारांसाठी पुरेशा संख्येने बेड उपलब्ध आहेत.
असे आहे मालाडचे जम्बो कोविड सेंटर
मालाड जम्बो कोविड सेंटरमध्ये 2170 बेडस् आहेत. त्यात जवळपास 70 टक्के म्हणजे 1,536 ऑक्सिजन बेड तर 190 आयसीयू बेड आहेत. लहान मुलांसाठी 200 ऑक्सिजन पेडियाट्रिक बेड आणि 50 पेडियाट्रिक आयसीयू बेड आहेत.
दररोज 15 लाख लसीकरणाची सरकारची तयारी
तिसऱया संभाव्य लाटेची शक्यता असताना आपल्याला अधिक सावध राहिले पाहिजे. जगात इतरत्र कोरोनाच्या डेल्टा प्लसचा संसर्ग परत वाढत असून आपल्याकडे सध्या रुग्णसंख्या घटत असली तरी आरोग्याचे नियम काटेकोरपणे पाळणे अतिशय महत्त्वाचे आहे. सरकार लसीकरणावर भर देत आहे. हळूहळू लसींची उपलब्धताही वाढत आहे. त्यानुसार नुकताच आपण एका दिवसात सात लाख लसीकरणाचा विक्रम केला. लसींचा असाच पुरवठा होत राहिला तर 15 लाख नागरिकांचे एका दिवसात लसीकरण करण्याची राज्य सरकारची तयारी आहे, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला.
इस्रायलचे सहाय्य; समुद्राचे पाणी पिण्यायोग्य करणार, मुंबईला मिळणार 200 दशलक्ष लिटर पाणी
मालाडच्या मनोरी येथे होणाऱया या महत्त्वाच्या निःक्षारीकरण प्रकल्पाचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासंदर्भात मुंबई महापालिका व इस्रायलच्या मे. आयडीई वॉटर टेक्नॉलॉजी यांच्यात करार झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा महत्त्वपूर्ण करार झाला असून मुंबईला दिलासा देणाऱया या प्रकल्पातून 2025 सालापर्यंत 200 दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे.
























































