हा वृद्धाश्रम नव्हे, नव्या आनंदी बालपणाची जागा! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘रमाधाम’च्या नव्या वास्तूचे लोकार्पण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘रमाधाम हा वृद्धाश्रम नाही. वृद्धावस्था म्हणजे दुसरे बालपण असते. ही दुसऱ्य़ा बालपणाची जागा आहे आणि येथील हिरवळ ही गवताची नाही तर अनेक वृद्ध मातापित्यांच्या आयुष्यात आलेल्या नव्या आनंदाची हिरवळ आहे,’ असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज खोपोली येथील ‘रमाधाम’ वृद्धाश्रमाच्या नव्या दिमाखदार वास्तूचे लोकार्पण केले. हा सोहळा ऑनलाईन पद्धतीने पार पडला.

लाखो-करोडो शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या संकल्पनेतून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी साकारलेल्या ‘रमाधाम’ वृध्दाश्रमाचे नूतनीकरण झाले आहे. अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशा या नव्या वास्तूचे लोकार्पण करताना उद्धव ठाकरे यांनी रमाधामच्या आठवणींना उजाळा दिला. रमाधामच्या जागी पूर्वी पोल्ट्रीच्या उजाड शेड्स होत्या, त्या जागी शिवसेनाप्रमुखांनी माँसाहेबांच्या इच्छेखातर रमाधाम नावाचे नंदनवन फुलवले, असे उद्धव ठाकरे म्हणाले. याप्रसंगी सौ. रश्मी ठाकरे यासुध्दा उपस्थित होत्या.

‘आपल्याला आयुष्यात करावा लागणारा संघर्ष मुलांना करावा लागू नये असे आईवडिलांचे एक स्वप्न असते. आपण जे स्वप्न पूर्ण करू शकत नाही ते मुलांनी पूर्ण करावे अशी त्यांची इच्छा असते. त्यासाठी मुलांना फुलपाखराचे नाही तर गरूडाचे पंख फुटावे यासाठी ते मेहनत करत असतात. पण मुले मोठी झाल्यानंतर स्वत:च्याच विश्वात रमतात. ज्यांनी आपल्याला जन्म दिला, संस्कार केले, ज्यांच्या आशीर्वादाने आपण मोठे झालो त्यांचा त्यांना विसर पडतो आणि पुढची परिस्थिती निर्माण होते. अशा ज्येष्ठांना स्वत:चे घर, स्वत:चे आयुष्य असावे या भावनेतूनच रमाधाम स्थापन झाले. आज ही रमाधामची नवी वास्तू ज्यांची आहे त्यांना मी सोपवत आहे,’ असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

‘हा रमाधाम आजपर्यंत जो जपला आणि जोपासला तो शिवसेनाप्रमुखांच्या शिवसैनिकांनी. अनेक शिवसैनिक सणवार व अन्य वेळी इथे येऊन येथील वृद्धांना आनंद देण्याचे काम करतात.’ अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी रमाधामच्या कार्याला हातभार लावणाऱ्य़ा शिवसैनिकांचे कौतुक केले. या लोकार्पण सोहळ्यावेळी शिवसेना नेते, उद्योगमंत्री सुभाष देसाई आदी उपस्थित होते.

या लोकार्पण सोहळ्याचे सूत्रसंचालन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिने कवी वसंत बापट यांची ‘देहमंदिर, चित्त मंदिर, एक तेथे प्रार्थना’ ही कविता आणि संत तुकाराम महाराज यांचा ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ ही अभंगरचना सादर केली. ‘गप्पाष्टक’कार संजय उपाध्ये यांनी यावेळी आयुष्याच्या उत्तरार्धात दैनिक ‘सामना’, शिवसेना, शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि रमाधाम अशी शिवसेनाप्रमुखांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी मी सर्व सहकाऱ्य़ाच्या साक्षीने यथाशक्ती पार पाडली. रमाधामचीही जबाबदारी देताना शिवसेनाप्रमुखांनी तेथील हिरवळीला धक्का लावू नको असे सांगितले होते. आज त्या हिरवळीमध्येच हिरवळ फुलवतोय याचा अभिमान आहे. – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

‘रमाधाम’ मध्ये वास्तुशांती आणि मंत्रजागर

आजी-आजोबांचे हक्काचे घर असलेल्या खोपोलीतील नव्या रमाधाम वृद्धाश्रमाचे शनिवारी लोकार्पण करण्यात आले. त्यानिमित्त वास्तुशांत आणि मंत्रजागर करण्यात आला. भक्तिभाव आणि निसर्गरम्य प्रसन्न वातावरण यामुळे ‘रमाधाम’ची वास्तू खऱ्य़ा अर्थाने पावन झाली. पुरोहितांचे तार सप्तकातील मंत्रसूर आणि आजी-आजोबांच्या चेहऱ्य़ावरील आनंद यामुळे लोकार्पण सोहळा संस्मरणीय ठरला. रमाधाम ट्रस्टचे अध्यक्ष चंदूमामा वैद्य व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी शिवसेना सचिव व खासदार अनिल देसाई, सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष  आदेश बांदेकर, शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील, आमदार महेंद्र थोरवे, स्थानिय लोकाधिकार समिती महासंघाचे चिटणीस वामन भोसले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

बाळासाहेबांनी वृद्धांकरिता वृद्धाश्रम काढायचे ठरवले. ते कीव येते म्हणून अजिबात नाही. त्यांनी कधी कुणाची कीव केली नाही. ते एकवेळ रागावले, पण कीव केली नाही. प्रेम मात्र अफाट केले. आता बाळासाहेब नाहीत. ते पुढे गेले. पण वडिलांचे कार्य आता मुले पुढे करत आहेत. या सर्व खटाटोपामध्ये आपल्यावर एक जबाबदारी आहे. ती म्हणजे प्रेम करण्याची. प्रेम ही या वृद्धाश्रमाची मूळ कल्पना आहे. ज्यांना हिडिसफिडिस होते, ज्यांना तिटकारले जाते, झिडकारले जाते त्यांच्यावर प्रेम करा. -महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय जीवनामध्ये प्रबोधनकार ठाकरे आणि रमाबाई आणि पुढील कालखंडात स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेब मीनाताई हे प्रेरणादायी व आदरणीय राहिले आहेत. सामाजिक कार्य पुढे नेण्याची परंपरा ठाकरे कुटुंबीयांची आहे. शिवसेना चालवत असताना शिवसेनाप्रमुखांनी शिवसैनिकांना नेते म्हणून आधार दिला आणि मीनातार्इंनी वात्सल्य दिले. त्यांनी स्थापन केलेल्या रमाधामची आज नवी अद्ययावत वास्तू उभी राहिली. वृद्धांकरिता किती अद्ययावत वास्तू असावी त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रमाधाम आहे. वृद्धांचा पुढील काळ आनंदी व समाधानी जाईल अशी व्यवस्था तिथे आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा वृद्धाश्रम पुढील कालखंडात वृद्धांना अधिक आनंद देईल, असा विश्वास आहे. रमाधामसाठी शुभेच्छा. -महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केले – चंदूमामा वैद्य

 ‘रमाधाम’च्या नूतन वास्तूसाठी मदत करणारे असंख्य हितिंचतक आणि देणगीदार यांचे यावेळी ‘रमाधाम’चे अध्यक्ष व निमंत्रक चंदूमामा वैद्य यांनी यावेळी मन:पूर्वक आभार व्यक्त केले. आजच्या शुभदिनी आपल्याला मीनाताई आणि स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येत असल्याचे सांगतानाच रमाधाम स्थापनेच्या आठवणींना उजाळा दिला. 1990 मध्ये मीनातार्इंच्या इच्छेपोटी ‘बाळासाहेबांनी खोपोली येथील ही जागा घेऊन रमाधामची स्थापना केली. त्यावेळी इथे पोल्ट्री होती. बाळासाहेब, मीनाताई, वुंâदाताई, सुधा चुरी, प्रमोद नवलकर, सुबीरकुमार चौधरी व असंख्य शिवसैनिकांनी अहोरात्र मेहनत घेऊन या जागेचा कायापालट केला. इथे खूप झाडे व निसर्ग होता म्हणून बाळासाहेबांनी ही जागा पसंत केली होती. एक ना एक दिवस या रमाधामचा पूर्ण कायापालट करून एक सुशोभित आणि महाराष्ट्रातच नाही तर देशातील उत्कृष्ट अशा वृद्धाश्रमाची निर्मिती करू असे ते म्हणाले होते. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे स्वप्न साकार केले.’ असे वैद्य यावेळी म्हणाले. नव्या वास्तूसाठी मदत करणारे दोराबजी टाटा ट्रस्ट, जमनादास फाऊंडेशन, बी. जी. शिर्के कंपनीचे अध्यक्ष,जिंदाल कंपनीचे अध्यक्ष, सुरेंद्र व सुनील मित्तल, वास्तुविशारद शशी प्रभू तसेच शिवसेनेचे सर्व नेते, पदाधिकारी आणि आजी-माजी लोकप्रतिनिधींचेही यावेळी वैद्य यांनी आभार मानले.

  • अशी आहे नवी वास्तू तीन मजली सुसज्ज इमारत
  • 100 जणांच्या वास्तव्याची व्यवस्था
  • 4 आणि 10 व्यक्ती राहू शकतील अशी प्रशस्त दालने
  • अद्ययावत भोजनगृह, योग, व्यायाम, संगीत, भजन, मनोरंजनाची व्यवस्था
  • भरपूर प्रकाश, खेळती हवा, नयनरम्य हिरवाई
  • जेवणासाठी आश्रमाच्या बागेमध्येच भाज्या पिकवण्याची व्यवस्था

निसर्गाच्या सान्निध्यात कलासक्त नजरेतून साकारलेला रमाधाम

श्रद्धेय मीनाताई आणि श्रद्धेय बाळासाहेबांनी तीस वर्षांपूर्वी रमाधाम वृद्धाश्रमाची मुहूर्तमेढ रोवली. अत्यंत जिव्हाळ्याने या प्रकल्पात उभयतांनी लक्ष घातले.  उद्धवजींनी बाळासाहेबांच्या इच्छेला लक्षात ठेवून निसर्गाच्या सान्निध्यात आपल्या कलासक्त नजरेतून साकारलेल्या या नूतन रमाधामच्या उद्घाटनानिमित्त खूप खूप शुभेच्छा.- भारतरत्न लता मंगेशकर

रमाधाम म्हणजे सगळ्या पिढीला आधार देणारी संकल्पना!

रमाधामची संकल्पना शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या मनात होती. त्याची त्यांनी इथून सुरुवात केली. ती सगळ्या पिढीला एक प्रकारचा आधार देणारी आहे. बाळासाहेबांचे स्वप्न आता पूर्ण होत आहे. वृद्धांना उत्तम सुविधा देण्याबाबत उद्धव ठाकरे यांनी केलेला संकल्प पूर्णत्वास येतोय याचा मला मनापासून आनंद आहे. हा वृद्धाश्रम वृद्धांना आपल्या हक्काचे घर वाटेल अशी त्याची उभारणी झाली आहे.- शरद पवार