
सामना प्रतिनिधी । नगर
राज्यात पहिल्या क्रमांकाचे मताधिक्य घेऊन निवडून येईन अशी पैज भाजपच्या एका उमेदवाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लावली होती. राज्याचे निकालाचे कौल पाहता या उमेदवाराचा विजय निश्चित झाला आहे. तर मुख्यमंत्र्यांनी पैज जिंकली आहे.
नगरचे शिवसेना भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पैज लावली होती. सर्वाधिक मताधिक्याने विजयी होणार अशी ही पैज होती. पण आजचे निकाल पाहून मी पहिल्या तीन मध्ये असेन असे सुजय विखे म्हणाले. तर, राज्यात युतीला 42 जागा येतील असे मुख्यमंत्री यांचे म्हणणे होते, तर मी त्यांना 38 जागांचा आकडा सांगितला होता. आताचा राज्याचा कल पाहता मुख्यमंत्री यांचा अंदाज खरा ठरतो आहे, असे मला दिसते, अशी प्रांजळ कबुली सुजय विखे यांनी दिली.
मताधिक्य बघता विखे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. माझा विजय मी माझे आजोबा बाळासाहेब विखे यांना अर्पण करतो, असेही सुजय विखे म्हणाले. मला पडण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. काहीजण राजकारणापलीकडे एकत्र येऊन माझा विरोधात एक झाले. पण नगर जिल्ह्यातील जनतेने सर्वाना उत्तर दिले आहे, असा टोलाही त्यांना विरोधकांना दिला आहे.

























































