
महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती देताना बुधवारी सीएमओ ट्विटर हँडलवर ‘संभाजीनगर’ झळकले. या ‘संभाजीनगर’ उल्लेखावरून उलटसुलट चर्चा सुरू असतानाच आज सायंकाळी गुंठेवारी नियमित करण्याच्या महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या निर्णयाची माहिती देताना पुन्हा एकदा सीएमओ ट्विटर हँडलवर ‘संभाजीनगर’ झळकले.
संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात खाटा वाढविण्याचा निर्णय बुधवारी ट्विट करताना त्यामध्ये संभाजीनगर असा उल्लेख करून औरंगाबाद हा शब्द कंसात टाकण्यात आला होता. या उल्लेखावरून काँग्रेस, राष्ट्रवादीसह विविध पक्षाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. ही चर्चा सुरू असतानाच आज ‘संभाजीनगरवासीयांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली’ असा उल्लेख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ट्विटमध्ये आल्याने पुन्हा एकदा ‘संभाजीनगर’ सीएमओ ट्विटर हँडलवर झळकले.
संभाजीनगरवासीयांच्या घरांचे स्वप्न साकार… आश्वासन दिले त्याची पूर्तता झाली! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 31 डिसेंबर 2020 पर्यंत राज्यातील नियमित न झालेल्या गुंठेवारी नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. मी काही दिवसांपूर्वी संभाजीनगरवासीयांना याविषयी आश्वासन दिले होते, त्याची पूर्तता केली आहे, असे ट्विट सीएमओ ट्विटर हँडलवर करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभाजीनगरवासीयांना या निर्णयाबद्दल शुभेच्छा दिल्या. संभाजीनगरसारख्या मराठवाडयाच्या राजधानी शहरातील सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न साकार होणार असून उत्तम रितीने नागरीकरण होऊ शकेल. यापुढे देखील असे जनहिताचे निर्णय घेण्यात येतील त्याकरिता आपले सहकार्य आणि प्रेम असेच राहू द्या, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
छत्रपती संभाजी महाराज आमचेही दैवत! – बाळासाहेब थोरात
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने शहरांचे परस्पर नामांतरण करू नये. सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे. शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही.’ छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
कुणी जाणीवपूर्वक गडबड केली का हे तपासू – उपमुख्यमंत्री
बुधवारी रात्रीपासून या विषयावर सातत्याने बातम्या ऐकायला मिळतात. सरकारचं काम करत असताना एखादी गोष्ट घडलेली असताना त्यामागची पार्श्वभूमी काय आहे. कोणी जाणीवपूर्वक गडबड केली का? या बाबी आम्ही तपासू, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
टायपिंग एरर – अस्लम शेख
कधी कधी टायपिंग एरर असते किंवा एखाद्या व्यक्तीने लिहून दिलेलं असतं. त्यामुळे चूक होऊ शकते. त्यामुळे हे ट्विटर अकाऊंट हॅण्डल करणाऱ्याला समज देण्यात येईल. मुख्यमंत्री, पंतप्रधान किंवा मी मंत्री म्हणून ट्विटरचं अकाऊण्ट हॅण्डल करत नाही. ज्या ट्विटर हॅण्डल करणाऱ्याकडून चूक झालीय त्याला समज देण्यात येईल, असे मत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी व्यक्त केले.
भाजपला टीका करण्याचा अधिकार नाही – आदित्य ठाकरे
संभाजीनगरवरून सुरू असलेल्या भाजपच्या राजकारणावर बोलताना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजपला बोलण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले. भाजपने मागील पाच वर्षांत काही केले नाही. आता संभाजीनगरमध्ये विकास होतोय, ही बाब त्यांना खटकत असावी, असा टोला लगावला.
































































