
महानगर गॅस लिमिटेडने ग्राहकांना पुन्हा दणका दिला असून सीएनजी आणि पीएनजीच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. देशातील होणाऱ्या सततच्या इंधन दरवाढीमुळे जनता महागाईत होरपळत असताना आता महानगर गॅस लिमिटेडनेही दरवाढ करत ग्राहकांना मोठा दणका दिला आहे. नैसर्गिक वायूच्या वाढत्या किंमतीमुळे दरवाढ करण्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे, एमजीएलने स्पष्ट केले आहे.
देशांतर्गत उत्पादित नैसर्गिक वायूच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. इंधन दरवाढीमुळे डिझेल, पेट्रोल आणि नैसर्गिक वायूंचे दर उच्चांकी पातळीवर आहेत. नासर्गिक वायूंच्या वाढत्या किंमतीमुळे एमजीएलने दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांच्या हिताचा विचार करता दर स्थिर ठेवण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. मात्र, नैसर्गिक वायूच्या वाढत्या किंमतीमुळे दरवाढ गरजेचे असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
एमजीएलने सीएनजीच्या दरात 7 रुपये प्रतीकिलो तर पीएनजीमध्ये 5 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ मंगळवारी मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. या दरवाढीमुळे मुंबई आणि परिसरात सीएनजीची किंमत 67 रुपये प्रतीकिलो तर पीएनजीची किंमत 41 रुपये प्रती एससीएम अशी होणार आहे.
























































