
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी बँकांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने सर्व सहकारी बँकांमधील कर्मचाऱयांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कोरोनावरील लसीच्या तुटवडय़ामुळे राज्य बँकेची मोफत लसीकरणाची मोहीम सध्या तरी बारगळली असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुरेशी लसच उपलब्ध होत नाही. त्यामुळे मोफत लसीकरण मोहीम राबवायची कशी, असा प्रश्न बँकांसमोर उभा राहिला आहे.
राज्यभरात 31 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका असून तेथे जवळपास 20 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. नागरी सहकारी बँकांमध्ये 1 लाख 90 हजार कर्मचारी आहेत, तर एकटय़ा मुंबईत 60 सहकारी बँकांमध्ये 20 हजारांहून अधिक कर्मचारी आहेत. कोरोना महामारीच्या संकटातही हे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून ग्राहकांना सेवा देत आहेत. त्याची दखल घेत राज्य सहकारी बँकेने सर्व सहकारी बँकांचे कर्मचारी, संचालकांचे मोफत लसीकरण करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला दिला होता. मात्र सध्या लसीचा तुटवडा असून लसीअभावी अनेकदा सार्वजनिक लसीकरण पेंद्रे बंद ठेवावी लागत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहेत. त्यामुळे बँकेने घेतलेल्या निर्णयानुसार सध्या तरी सहकारी बँक कर्मचाऱयांच्या लसीकरणाची मोहीम राबवणे शक्य नसल्याचे राज्य बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनासकर यांनी सांगितले. त्यामुळे मोफत लसीकरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या बँक कर्मचाऱयांच्या पदरी निराशा पडणार आहे.


























































