
पर्यटकांचा अतिउत्साहीपणा मालवण किनारपट्टीवर पुन्हा एकदा दिसून आला. ओहोटीमुळे दांडी येथून तयार होणाऱ्या वाळूच्या मार्गातून चारचाकी गाड्या घेऊन काही हौशी पर्यटक मंगळवारी थेट पद्मगड ठिकाणावर पोहोचले. भरती येताच पाणी वाढले तर पुन्हा बाहेर जाण्याचा कोणताही मार्ग नसल्याची कोणतीही भीती त्या पर्यटकांना नव्हती. दरम्यान, मालवण पोलिसांनी संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी आपण येथे आल्याचे उत्तर या पर्यटकांनी दिल्याने पोलीस आवाक झाले. कारण पुढे समुद्राचे पाणी व खडक असल्याने कोणताही सुलभ मार्ग किल्ले सिंधुदुर्ग याठिकाणी जाण्यास नाही. होडी सेवाही बंद आहे. मात्र काहीही कारण सांगून पर्यटक त्या ठिकाणी होते. एकूणच या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर वाहतुक पोलीस गुरुप्रसाद परब त्या ठिकाणी पोहचले. दरम्यान पोलिसांना लांबून बघून काही गाड्या तिथून निघाल्या. एक गाडी पोलिसांना सापडली. त्यात असलेल्या पर्यटकांना पोलिसांनी समज दिली तसेच दंडात्मक कारवाई केली.
पर्यटकांनी अशा प्रकारे स्वतःचा जीव धोक्यात घालून किनाऱ्यावर जाऊ नये. यासाठी पोलीस व महसूल प्रशासनाकडून सातत्याने आवाहन करण्यात येते. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी गाड्या घेऊन आलेल्या पर्यटकांना पोलिसांनी समज देत बाहेर काढले होते. मात्र पुन्हा तोच प्रकार दिसून आला. दरम्यान, असे पर्यटक पुन्हा आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. अशी माहिती मालवण पोलीस निरीक्षक विजय यादव यांनी दिली आहे.




























































