
मुंबईकरांना पुढचे किमान पाच दिवस चांगलीच हुडहुडी भरणार आहे. उत्तर हिंदुस्थानात सुरू असलेल्या बर्फवृष्टीचा परिणाम मुंबईच्या वातावरणावर झाला असून शहराचा पारा थेट 11 अंशांपर्यंत खाली घसरणार आहे. किमान तापमानातही मोठी घट होणार असल्याने रात्रीच्या सुमारास थंडीचा कडाका अनुभवायला मिळणार आहे. दिवसाच्या तापमानातही गारवा असेल, असे कुलाबा वेधशाळेने गुरुवारी जाहीर केले.
उत्तर हिंदुस्थानात मागील दोन दिवसांपासून जोरदार बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे तेथून महाराष्ट्राच्या दिशेने वाहणाऱ्या कोरडय़ा वाऱयांनी मुंबईसह राज्यातील किमान तापमान यंदाच्या हंगामातील निच्चांकी पातळीवर आणले आहे.
मागील 10 वर्षांत मुंबईचा पारा एक-दोन वेळा 11 अंशांपर्यंत घसरला आहे. यंदाचे तापमान त्या निच्चांकी तापमानाच्या विक्रमाशी बरोबरी साधणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून माथेरान, महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणांइतका गारवा आहे.
उत्तर हिंदुस्थानात कडाक्याच्या थंडीची लाट
जोरदार बर्फवृष्टीमुळे उत्तर हिंदुस्थान कडाक्याच्या थंडीने गारठला आहे. उत्तरेकडील बहुतांश राज्यांचा पारा उणे 4 अंशांपर्यंत तळ गाठण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर दिवसाचे कमाल तापमान 2 अंशांपर्यंत खाली घसरेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. राजधानी दिल्लीमध्येदेखील थंडीचा कडाका वाढणार असून रेकॉर्डब्रेक किमान तापमानाची नोंद होण्याची शक्यता आहे.
रात्र थंडीची आहे…
मुंबईसह कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, रायगड या जिह्यांचे रात्रीचे तापमान 11 ते 15 अंशांपर्यंतची निच्चांकी पातळी गाठणार आहे.
मुंबई शहर व उपनगरांमध्ये शुक्रवारी रात्रीपासून कडाक्याची थंडी सुरू होईल. 17 जानेवारीपर्यंत किमान तापमान 11 अंशांपर्यंत खाली जाईल, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.
उत्तरेकडील बर्फवृष्टी व तेथून आलेल्या कोरडय़ा वाऱयांमुळे शहराचे तापमान मोठय़ा प्रमाणावर घसरेल. किमान पाच दिवस हा थंडीचा कडाका मुक्कामी राहील, असे हवामान शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले.






























































