
आठ महिन्यांनंतर कोरोना संकट साधारण मंदावल्याने देशातील महाविद्यालये टप्प्याटप्प्याने सुरू केली जात आहेत. मात्र काळजी घ्यावी लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सुरक्षेच्या गाईडलाइन्स दिल्या आहेत. त्यांचे पालन करणे महाविद्यालयांना बंधनकारक असणार आहे.
देशातील महाविद्यालये गेल्या मार्चच्या मध्यावधीपासून लॉकडाऊनमुळे बंद आहेत. त्यामुळे बहुतांश परीक्षा या ऑनलाईन घेतल्या गेल्या. केंद्र सरकारने राज्यांना तेथील कोरोना परिस्थितीनुसार 15 ऑक्टोबरपासूनच महाविद्यालये सुरू करण्याची परवानगी दिली आहे. आता महाविद्यालये सुरू केली जात आहेत. त्यासाठी यूजीसीने पुढील गाईडलाइन्स दिल्या आहेत.
महाविद्यालये निश्चित कधी सुरू करायची याचा निर्णय राज्य सरकारांनी घ्यावा असे यूजीसीने म्हटले आहे. पंजाब आणि हरयाणा या राज्यांनी दिवाळीनंतर 16 नोव्हेंबरपासून महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे तर पश्चिम बंगालमध्ये डिसेंबरपासून वर्ग सुरू होणार आहेत. केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱया विद्यापीठांमधील वर्ग कधीपासून सुरू करायचे याचा निर्णय संबंधित संस्थेच्या प्रमुखांना घ्यावा लागणार आहे.
यूजीसीच्या गाईडलाइन्स…
– उच्च शिक्षण संस्थांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान अभ्यासक्रमातील संशोधक आणि पदव्युत्तर विद्यार्थी तसेच अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचे वर्ग आधी 50 टक्केच उपस्थितीत सुरू करावेत.
– इतर विद्यार्थ्यांची शिकवणी ऑनलाईन घेण्यात यावी, परंतु त्यांनी गटागटाने अधूनमधून प्राध्यापकांची भेट घेऊन त्यांचे मार्गदर्शन घ्यावे.
– वर्गांना प्रत्यक्ष उपस्थित न राहता घरी राहून ऑनलाईन शिकण्यास इच्छुक विद्यार्थ्यांना संस्थेने अभ्यास साहित्य मिळेल याची काळजी घ्यावी.
– परदेशात असणाऱया विद्यार्थ्यांची ऑनलाईन शिकवणी घ्यावी.
– प्रवेशद्वारावर थर्मल क्रीनिंग करूनच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जावा.
– वर्गांचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करावे.
– सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या बॅचेसमध्ये वर्गीकरण करावे.
– विद्यार्थ्यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांना मास्क अनिवार्य असावा.
– बाहेरच्या व्यक्तींना शक्यतो संस्थेत प्रवेश देऊ नये.
– सांस्कृतिक कार्यक्रम आणि बैठका टाळाव्यात.
– सोशल डिस्टन्सिंग राखता येऊ शकेल अशाच खेळांना परवानगी द्यावी.
– वसतिगृहे उघडली तर त्यात रूम-शेअरिंगला परवानगी देऊ नये.
– वसतिगृहांमध्ये परतणाऱया विद्यार्थ्यांना 14 दिवस क्वारंटाइन ठेवावे.
– निवासी विद्यार्थी आणि शिक्षकांनी संस्थेबाहेर जाणे शक्यतो टाळावे. त्यांना अत्यावश्यक वस्तू संस्थेमध्येच उपलब्ध करून द्याव्यात.
– संस्थेमधील विद्यार्थी किंवा शिक्षण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांना तातडीने आयसोलेट करावे आणि त्यांच्या उपचारांची सोय संस्थेने करावी.
– संस्थेत पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास वर्ग घेणे बंद करणे, वसतिगृहातून बाहेर पडण्यास विद्यार्थ्यांना मनाई करणे, मेसमधून जेवण बाहेर देणे बंद करणे अशा उपाययोजना परिस्थितीच्या तीव्रतेप्रमाणे केल्या जाव्यात.



























































