
सामना ऑनलाईन । मुंबई
येत्या 5 मार्चला राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱयांनी राज्यव्यापी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. 12 आणि 24 वर्षे सेवा झालेल्या शिक्षकेतर कर्मचाऱयांना पदोन्नती देण्यास राज्य सरकार चालढकल करीत आहे, तसा जीआरही 7 डिसेंबरला काढला आहे. हा जीआर रद्द करण्याची शिक्षकेतर कर्मचाऱयांची मागणी आहे.
अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघाच्या 41व्या वार्षिक अधिवेशनात संघाचे अध्यक्ष डॉ. आर. बी. सिंह यांनी हा इशारा दिला. शिक्षकेतर कर्मचाऱयांचे वार्षिक अधिवेशन नुकतेच माटुंगा येथील खालसा महाविद्यालयात पार पडले. काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या अधिवेशनाचे उद्घाटन शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते झाले.
शिक्षकेतर कर्मचाऱयांना मार्गदर्शन करताना खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले, ‘सरकारने आश्वासित प्रगती योजना रद्द करण्यासंबंधी जो निर्णय घेतला आहे तो पुन्हा लागू करण्यासाठी उच्च शिक्षणमंत्र्यांकडे पाठपुरावा करू. वेळ पडल्यास मुख्यमंत्र्यांशी या विषयावर चर्चादेखील करू.’ याप्रसंगी खालसा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण माणगावकर, आमदार कालिदास कोळंबकर, नगरसेवक अमेय घोले, ऑल इंडिया कॉलेज ऍण्ड युनिव्हर्सिटी फेडरेशनचे महासचिव नारायण शहा, उपाध्यक्ष कनक राजन, महासंघाचे अध्यक्ष विजय निकम, संघाचे अध्यक्ष डॉ. आर. बी. सिंह, सरचिटणीस माधव राऊळ आदी उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित मुंबई विभागाचे लेखाधिकारी पराग पाटील तसेच कोकण विभागाचे लेखाधिकारी लक्ष्मण धुळेकर यांनी सातव्या वेतन आयोगाच्या वेतननिश्चितीचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी शिक्षक आमदार कपिल पाटील, निरंजन डावखरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.


























































