
न्हावाशेवामध्ये एका कॉलेज विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. त्याच्याच कॉलेजच्या मित्रांनी त्याला मारहाण आणि धमकावल्याने त्याने हे धक्कादायक पाऊल उचलले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
किरण (नाव बदलेले) हा सीवूड येथील एका कॉलेजमध्ये शिकत होता. त्याचे रमेश आणि गोपाळ (नाव बदलेले) हे दोन मित्र त्याच्यासोबत दहावीपर्यंत शिकत होते. रमेश आणि गोपाळला अंमली पदार्थांचे व्यसन होते. ही बाब त्याने एका मैत्रिणीला सांगितली होती. रमेश आणि गोपाळला याबद्दल कळाले. तेव्हा 12 नोव्हेंबर रोजी दोघांनी मिळून किरणला मारहाण केली, तसेच याबाबत वाच्यता केल्यास त्याला मारण्याची धमकीही दिली होती.
किरण कॉलेजहून घरी आला तेव्हा तो खूप उदास होता. इन्स्टाग्रामवरून त्याने एका मित्राला मेसेज करून संपूर्ण घटना सांगितली. तसेच आता आपण आत्महत्या करत असल्याचेही त्याने सांगितले आणि मोबाईलचे इंटरनेट बंद केले. या मित्राकडे किरणच्या कुटुंबीयांचा फोन नंबर नसल्याने त्याला कुणाशीच संपर्क साधता आला नाही.
किरणचे बाबा दुपारी पाऊणे चारच्या सुमारास घरी आले. तेव्हा किरणचे बूट त्यांना घराबाहेर दिसले. किरण आपल्या खोलीत झोपला असावा असा अंदाज त्यांनी बांधला. संध्याकाळ झाली तरी किरण खोलीतून बाहेर आला नव्हता. वडिलांनी जेव्हा त्याच्या खोलीत पाहिले तेव्हा किरणने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
किरणचे अंत्यसंस्कार आटोपून आल्यानंतर किरणच्या मोठ्या भावाने त्याचा फोन पाहिला. किरणने आपल्या मित्राला पाठवलेले मेसेज मोठ्या भावाने पाहिले. त्याने तत्काळ आपल्या वडिलांना सांगितले. वडिलांनी पोलीस स्थानकात रमेश आणि गोपाळ विरोधात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी दोघांविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. दोघे अल्पवयीन असल्याने त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. दोन्ही आरोपींना कोर्टात हजर केले जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.






























































