टिवल्या-बावल्या : आई, माँ, बा, मदर!

>> शिरीष कणेकर

आई ही काय चीज आहे हे मला कधीच कळू शकलेलं नाही आणि यापुढे कळू शकेल असं वाटत नाही. इतर नात्यातली स्त्री कुठल्याही माणसासारखी गुणदोषांनी युक्त असते, पण एकदा आई म्हटलं की, ती अद्भुत रसायन होते. म्हणूनच ही म्हण जन्माला आली – ‘God could not be everywhere, so he made mothers.’ (देव सर्वत्र असू शकत नाही म्हणून त्यानं आई घडवली.)

माझ्या अत्यंत आवडत्या शेरांपैकी हा एक आहे-

मेरी माँको गिनती नहीं आती यारों।
मैं एक रोटी मांगता हू, वो हमेशा दो लेके आती है।

किती खरं आहे, नाही? मुलाच्या पोटात दोन घास जास्त जावेत यासाठी तडफडते, तरसते, तळमळते ती आई. ‘खायचं तर खा नाहीतर नका खाऊ’ अशा शब्दांत प्रेमळ आग्रह करणारी आयुष्यात आली की मग आईची जास्तच आठवण येते, जास्तच किंमत कळते. बायकोचा आतड्यांशी कुठं संबंध असतो? ती परकी असते व अनेकांच्या बाबतीत अखेरपर्यंत परकीच राहते.

काही वर्षांपूर्वी मी एक घडलेला किस्सा पेपरमध्ये वाचला होता. एका बाईचा तान्हा मुलगा जवळजवळ ट्रकखाली आला होता. आत ड्रायव्हर नसलेला ट्रक इंच-दोन इंच मागे सरकला असता तर ते अर्भक चिरडलं गेलं असतं. त्याच्या आईचा थरकाप झाला. कोणाची मदत मागण्याइतका वेळ नव्हता. दोन क्षणात कोण काय मदत करू शकेल हेही तिला कळत नव्हतं. तिच्या तोंडाला कोरड पडली, हातापायांना कंप सुटला. तिच्या डोळय़ादेखत तिचा छकुला देवाघरी चालला होता. एकाएकी तिच्यात काय संचारलं कोण जाणे. कुठून एवढी ताकद अंगात आली माहीत नाही. ती भानामती झाल्यासारखी त्वेशानं पुढे सरसावली. दोन्ही हातांनी तिनं तो ट्रक चक्क उचलला. माणसं धावली. त्यांनी त्या मुलाला अलगद बाहेर काढलं. मुलाची आई आनंदानं गदगदून रडत होती. आपण चक्क ट्रक उचलला हे तिला स्वतःलाच खरं वाटत नव्हतं. ज्यांनी बघितलं त्यांचा डोळ्यांवरचा विश्वास उडाला.

उद्या मोठा झाल्यावर तो मुलगा कशावरून तरी आईला वेडवाकडं, तोडून बोलला तर त्याला कोणीतरी सांगायला हवं की बाळा रे, जिला आज तू फाडफाड बोलतोयस तिनं एकदा तुला जन्म दिलाय व एकदा मरणाच्या दारातून ओढून आणलंय. हे जमलं तर लक्षात ठेव. नाहीतर राहू दे. तिनं जे काही केलं त्याचे उपकार तू भविष्यात स्मरशील म्हणून केलं नव्हतं. तिचा तुझ्यावर जीव होता. तुझ्यासाठी तिला शक्य आहे ते ती आयुष्यभर करील. त्या बदल्यात तू आईसाठी काय करतोयस हे अगदीच बिनमहत्त्वाचं आहे. ‘तुझें और क्या दू मैं दिल के सिवा, तुमको हमारी उमर लग जाय’ दुधो न्हाओ, फुलो फलों, जुग जुग जिओ…

बाप न बोलता मुलावर निस्सीम प्रेम करतो. त्याच्यासाठी मोलमजुरी करतो, खस्ता खातो, कर्ज काढतो, आजारपणात रात्र रात्र त्याच्या उशाशी बसून जागरण करतो, आपलं अवघं आयुष्य गहाण टाकतो यात काहीही संदेह नाही, पण तो ट्रक उचलू शकत नाही. त्यासाठी देवानं आईची निर्मिती केलीय. आई हिरावून घेऊन देवानं माझ्यावर काही जन्माचा सूड उगवलाय. काक्या, माम्या, मावश्या सगळय़ा मिळून एका आईची जागा घेऊ शकत नाहीत. आई ‘इर्रिप्लेसेबल’ असते. ‘अमकी तमकी मला आईसारखी आहे’ असं कुठं ऐकलं, वाचलं की नकळत माझ्या ओठांवर एक कडवट हसू येतं. आई म्हणजे काय नगाला नग असते? ज्याला आहे त्याला असते. ज्याला नाही त्याला नसते. मला नाही, पण म्हणून मी रस्त्यात आई शोधत फिरत नाही. देवाला मला आई द्यायची असती तर असलेल्या आईला मुळात तो घेऊनच का गेला असता? तर्कशास्त्र-तर्कशास्त्र आई गेली की तेवढंच मागे राहतं. आई असली की ती सगळं तर्कशास्त्र मस्तपैकी चुलीत घालते. म्हणूनच ती लेकराला म्हणू शकते. ‘तुम जियो हजारो साल, साल के दिन हो पचास हजार’….

अलीकडची घटना, जुन्नर तालुक्यातील मुंढे वस्ती, ओतूर येथे दीपाली व दिलीप माळी हे जोडपे ऊस तोडणीच्या कामासाठी आले होते. ते व त्यांचा दीड वर्षाचा मुलगा ज्ञानेश्वर रात्री शेतात झोपले होते. पहाटे दीडच्या सुमारास मुलाच्या किंचाळीने दीपालीला जाग आली. बघते तो काय, ज्ञानेश्वरला बिबळय़ानं तोंडात धरलं होतं. वास्तविक तिनं भीतीनं गर्भगळीत व्हायला हवं होतं, पण तसं काही झालं नाही. काही करून मृत्यूच्या जबडय़ात असलेल्या आपल्या तान्हुल्याला वाचवायचं या एकाच भावनेने ती पेटून उठली. ती हातानं वाघाला मारत सुटली. या अनपेक्षित हल्ल्यानं बिबळय़ा बावरला व मुलाला सोडून जंगलात दिसेनासा झाला. नुसत्या हातांनी मुकाबला करणारा मर्त्य मानव बिबळय़ानं प्रथमच पाहिला असणार. बिबळय़ा आपल्याला खाऊन टाकेल अशा कचखाऊ, डरपोक विचारांना तिच्या मनात थारा नव्हता. तिला वाटेल ते करून आपल्या पोटच्या गोळ्याचा जीव वाचवायचा होता. दुसऱ्या कशाला महत्त्व नव्हतं. मुलासाठी जी वाघाशी दोन हात करते ती काय करणार नाही? इथे वाघ हरला. अर्थात, तो कधी स्पर्धेत नव्हताच ही गोष्ट वेगळी.

मातृप्रेमाची गाथा सांगणारा एक अतिशयोक्तीपूर्ण कपोलकल्पित किस्सा प्रसिद्ध आहे. एका मुलाचं एका मुलीवर नितांत प्रेम असतं. तिच्याशिवाय जगणं त्याला अशक्यप्राय झालेलं असतं. लग्नासाठी तिची एकच पण भयंकर अट असते. ‘तुझ्या आईचं हृदय मला आणून दे’ ती मागते तो हादरतो. आईचं हृदय द्यायचं म्हणजे तिला मारायचं कसं शक्य आहे? पण ती तिच्या अटीवर ठाम असते. अखेर नाइलाजानं तो तयार होतो. आईला मारून तिचं हृदय काढून घेऊन तो उतावीळपणे प्रेयसीकडे धावत सुटतो. तो उंबरठय़ावर ठेचकाळतो. त्यासरशी त्याच्या हातातलं आईच रक्तबंबाळ हृदय कळवळून विचारतं, ‘लागलं का रे बाळा?’

अलीकडे मला हा किस्सा अतिशयोक्तीपूर्ण व कपोलकल्पित वाटेनासा झालाय.

एका चित्रपटात स्मृतिभ्रंश झालेली नूतन आपल्याच मोठय़ा झालेल्या मुलाला न ओळखून म्हणते, ‘छोटे बच्चे माँ के बगैर नहीं रह सकते.’

त्यावर सद्गदित झालेला तो मुलगा (अनिल कपूर) म्हणतो, ‘किसी भी उमर के बच्चे माँ के बगैर नहीं रह सकते।’

हा पंच्याहत्तर वर्षांचा मुलगा या विधानाशी पूर्णपणे सहमत आहे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या