विदर्भातील पहिल्या कॉमन मॅनच्या पुतळ्याचे भारत विद्यालयात अनावरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बुलढाणा

सर्वसामान्य व्यक्तींच्या आशा-आकांक्षाचे प्रतिक असणार्‍या, जगविख्यात व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या कुंचल्यातून साकारलेली व्यक्तीरेखा म्हणजे कॉमन मॅन. या कॉमन मॅनचा पूर्णाकृती पुतळ्याचे आज भारत विद्यालयाचे अध्यक्ष हर्षवर्धन आगाशे, युथ लिग रिक्रिएशन सेंटर बुलढाणाचे पदाधिकारी सखाराम जतकर, डॉ. सीमा आगाशे, बीजीएसचे पदाधिकारी राजेश देशलहरा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारत विद्यालय परीसरात अनावरण करण्यात आले.

भारत विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक सेवाव्रती रमेश कोर्डे यांच्या ८८ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारत विद्यालयाचे अध्यक्ष हर्षवर्धन आगाशे यांच्या संकल्पनेतून या पुतळ्याची उभारणी करण्यात आली. कॉमन मॅनचा पुतळा हा विद्यार्थ्यांना सदैव सर्वसामान्यांच्या बाजूने उभी राहण्याची प्रेरणा देत राहील असा विश्वास हर्षवर्धन आगाशे यांनी व्यक्त केला. राजेश देशलहरा यांनी भारत विद्यालय परिसरातील प्रेरणादायी राहिलेल्या त्याच्या बालपणीच्या आठवणी सांगून भारत विद्यालय करीत असलेल्या विविध सामाजिक कार्याचा गौरव केला. शाळेचे उपमुख्याध्यापक राम पालवे यांनी रमेश कोर्डे यांनी शाळेच्या उभारणीमध्ये कसे व किती योगदान दिले आहे हे विद्यार्थ्यांना सांगितले.

आर.के. लक्ष्मण यांच्या कार्यकर्तृत्वावर व कॉमन मॅनच्या या प्रतिकृतीवर नरेंद्र लांजेवार यांनी विशेष प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन ग्रंथपाल नरेंद्र लांजेवार यांनी तर आभार उपमुख्याध्यापक राम पालवे यांनी मानले. संपूर्ण विदर्भात कॉमन मॅनचा हा पहिलाच पूर्णाकृती पुतळा असल्याची माहिती जाणकारांनी याप्रसंगी दिली. कॉमन मॅनच्या या पुतळा अनावरण प्रसंगी संस्थेचे सर्व शिक्षक, कर्मचारीवृंद तथा गावातील निमंत्रित, प्रतिष्ठीत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.